शिरूर : शिरूर नगरपरिषद निवडणुकीत मंगळवारी (दि. १८) झालेल्या छाननीत नगराध्यक्षपदाचे दाखल झालेले सर्व नऊ अर्ज वैध ठरले आहेत. तर नगरसेवकपदासाठीच्या एकूण १९३ अर्जांपैकी पाच अर्ज अवैध ठरले आहेत. यामुळे आता माघारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षपद हे इतर मागासवर्ग प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे. छाननी प्रक्रियेत पाच अर्ज बाद निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित जगताप व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रीतम पाटील यांच्या उपस्थितीत अर्जांची छाननी पार पडली. यामध्ये प्रभाग ११ : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी दिलेल्या तुषार वेताळ यांचा पक्षीय अर्ज सूचक नसल्याने अवैध, मात्र त्यांची अपक्ष उमेदवारी वैध. त्यामुळे ते राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात. प्रभाग २ : पूजा अमित शिर्के यांचा राष्ट्रवादी (शरद पवार गट)चा डमी अर्ज अवैध. प्रभाग १२ : महेंद्र पाचर्णे यांचा पक्षीय डमी अर्ज अवैध. प्रभाग ५ : लता ससाणे यांचा भाजपाचा अर्ज जोडपत्र नसल्यामुळे अवैध. प्रभाग ११ : शिवसेनेच्या सुप्रिया साकोरे यांच्या अर्जातील जोडपत्र नसल्याने अर्ज अवैध. मात्र, प्रभाग ७ मधून शिवसेनेकडून दाखल केलेला त्यांचा दुसरा अर्ज वैध ठरला आहे. नगराध्यक्षपदासाठी एकूण नऊ अर्ज दाखल झाले होते. सर्व अर्ज वैध ठरल्याने आता येत्या काही दिवसांत माघारीचा मोठा घडामोडींचा खेळ रंगणार आहे. या पदासाठी ओबीसी महिला श्रेणी असल्याने स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची निर्मिती झाली आहे. महायुतीत मोठी बिघाडी, तीनही पक्ष स्वतंत्र रिंगणात शिरूर नगरपरिषद निवडणूक महायुतीसाठी मोठी अग्निपरीक्षा ठरणार होती, मात्र भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना या तिन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवारी दिल्याने महायुती आघाडी प्रत्यक्षात फुटलेली दिसत आहे. यामुळे या तिन्ही पक्षांमधील अंतर्गत नाराजी आणि वर्चस्वाची लढत आता उघडपणे दिसू लागली आहे. आमदार माऊली कटकेंच्या गोटातील पाचर्णे कुटुंबाचा धक्कादायक निर्णय आमदार माऊली कटके यांनी विधानसभा निवडणुकीत साथ दिलेल्या पाचर्णे कुटुंबाने भाजपकडून स्वतंत्र पॅनल उभे करत मोठा राजकीय धक्का दिला आहे. यामुळे महायुतीचे गणित विस्कळीत झाल्याने शिरूरमध्ये ‘प्रतिष्ठेची लढत’ चिघळली आहे. महायुतीतील विसंवादामुळे या निवडणुकीत अनेक ठिकाणी बहुकोनी चुरस होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अर्ज वैधतेनंतर आता सर्वांचा नजर माघारीवर आहे. कोण माघार घेणार? कोणत्या प्रभागात कोणाचे समीकरण बदलणार? महायुतीतील अस्वस्थ-नाराजी कुठे फुटणार? यावरच आगामी नगरपरिषद निवडणुकीचे संपूर्ण चित्र अवलंबून राहणार आहे. एकंदरीत अर्ज छाननीने शिरूरमधील राजकीय तापमान आणखी वाढवले आहे. महायुतीतील फूट, ओबीसी महिला राखीव नगराध्यक्षपद,पाचर्णे कुटुंबानी भाजपाकडून स्वतंत्र पॅनल दिला असून नगराध्यक्ष पदासाठी आमदार माऊली कटके यांनी मोठी खेळी करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाकडून ऐश्वर्या अभिजीत पाचरणे यांना उमेदवारी दिल्याने निवडणुकीत मोठी चुरस वाढवली आहे.