Akole News : भंडारदरा धरणातून पाणी द्या, अन्यथा…; राजूर ग्रामस्थांचा सरकारला इशारा, पाहा काय आहे मागणी?
Akole News : भंडारदरा धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी मिळावे यासाठी राजूरकरांचे 'रास्तारोको' आंदोलन; १० महिन्यांपासून ६ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने संताप.

Akole News – आदिवासी भागातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेली राजूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता भंडारदरा धरणातून राजूर गावाला पाईप लाईनमधून पाणी मिळावे, यासाठी दि. ६ मार्च रोजी राजूर गाव बंद ठेऊन रास्तारोको आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही राजूर गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम असून, अद्यापपर्यंत तो निकाली निघालेला नाही.
सध्या अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा योजना कालबाह्य झालेल्या आहेत. सुधारित योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे गावास दररोज शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. गेल्या दहा महिन्यांपासून राजूर गावात सहा दिवसांनी अनियमित पाणीपुरवठा केला जात आहे. राजूर हे मध्यवर्ती गाव आहे.
ज्याप्रमाणे इतर शहरांना धरणातून थेट पाणी दिले जाते, त्याच धर्तीवर राजूरला भंडारदरा धरणातून पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र योजना मिळावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ६ मार्च रोजी गाव पूर्णतः बंद ठेवून ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
शासनाने तातडीने राजूरसाठी नवी पाणी योजना मंजूर करावी, असा ठराव ग्रामसभेत करण्यात मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती संतोष मुर्तडक यांनी दिली. दरम्यान, गावाला सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही शासनाची मूलभूत जबाबदारी असल्याचे निवेदनात नमूद केले असून या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी आदींना देण्यात आल्या आहे.





