Nevasa Crime : फत्तेपूरमध्ये दारूड्याची दहशत! फक्त १०० रुपयांसाठी पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला; नेमकं काय घडलं?
Nevasa Crime : फत्तेपूर ग्रामपंचायत चौकात भररस्त्यात दाम्पत्याला मारहाण; शनी शिंगणापूर पोलिसांकडून आरोपीवर गुन्हा दाखल.

Nevasa Crime – दारू पिण्यासाठी शंभर रुपये न दिल्याच्या कारणावरून एका व्यक्तीने पती-पत्नीला लोखंडी वस्तू आणि बांबूने बेदम मारहाण केल्याची घटना शनी शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नेवासा तालुक्यातील फत्तेपूर येथील ग्रामपंचायत चौकात ३ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
फिर्यादी ज्ञानेश्वर रामभाऊ कांत (वय २८ ) हे पत्नीसोबत असताना, आरोपी किरण राघू ससाणे याने त्यांना अडवले. आरोपीने दारू पिण्यासाठी १०० रुपयांची मागणी केली. मात्र, पैसे देण्यास नकार दिला असता, संतापलेल्या आरोपीने ज्ञानेश्वर यांना शिवीगाळ करत लोखंडी हत्यारासारख्या वस्तूने आणि बांबूच्या काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली.
पतीला वाचवण्यासाठी गेलेल्या पत्नी संगीता ज्ञानेश्वर कांत यांनाही आरोपीने सोडले नाही. त्यांनाही बांबूने बेदम मारहाण करण्यात आली. आरोपीने या दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याप्रकरणी ज्ञानेश्वर कांत यांनी शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी किरण ससाणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलीस हवालदार लबडे हे पुढील तपास करत आहेत



