Akole News : अकोलेच्या इतिहासात पहिली आमसभा गाजली ; नागरिकांनी अधिकार्यांवर प्रश्नांचा भडीमार केला

प्रभात वृत्तसेवा
अकोले – अकोले तालुक्याच्या इतिहासात लोकप्रतिनिधींनी बोलावलेल्या पहिल्या आमसभेला उदंड प्रतिसाद मिळाला. मतदारसंघातील नागरिकांनी रस्ते, वीज ,पाणी, आरोग्यसह विविध प्रश्नांचा अधिकाऱ्यांवर भडीमार केला. आमदार डॉ. किरण लहामटेंनी नागरिकांचे सर्व प्रश्न प्राधान्याने मार्गी लावून तीन महिन्यानंतर होणाऱ्या आमसभेत माहिती द्यावी, अश्या सूचना केल्या आहे.आमदार डॉ.किरण लहामटे यांचे संकल्पनेने पहिली आमसभा आज पंकज लॉन्स् येथे आ.लहामटे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी तहसीलदार सिद्धार्थ मोरे, प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी विशाल यादव , गटविकास अधिकारी अमर माने, प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे,नगरपंचायत मुख्याधिकारी धनश्री पवार ,पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब मेहत्रे, गटशिक्षण अधिकारी अरविंद कुमावत, उपविभागीय अभियंता चव्हाण, जलसंपदा शाखा अभियंता जोर्वेकर्, उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सूर्यवंशी,एसटी आगार व्यवस्थापक दराडे, कृषी अधिकारी अतुल पवार, अकोले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.श्यामकांत शेटे, राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे ,नायब तहसीलदार किसन लोहरे आदींसह सर्व् विभागाचे अधिकारी, ग्रामसेवक,तलाठी,मंडळाधिकारी उपस्थित होते.
या आमसभेत नागरिकांनी गर्दी केली होती. कार्यकर्त्यांनी योग्य नियोजन केले होते. प्रवेशद्वारात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची माहिती लिहून प्रश्न विचारणाऱ्यांना एक फॉर्म देऊन त्यात लेखी ही प्रश्न मांडायचा होता. तसेच प्रश्न विचारणाऱ्यांनी रांगेत यायचं व प्रत्येकाला प्रश्न मांडण्यास संधी होती. नागरिकांनी गावातील, वाडीवस्ती ,सामाजिक असे विविध प्रश्न विचारले. तसेच जलजीवन, मुख्यमंत्री सडक योजना, घरकुल योजनांसह विविध योजनांच्या कामातील त्रूटी दाखवत रस्ते ,पाणी, वीज,आरोग्य आदींच्या प्रश्नांवर आवाज उठवला.आ.लहामटे म्हणाले की, अधिकाऱ्यांनो आपण शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले पाहिजे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ केले पाहिजे. शासनाने एक दिवसात 65 मिमी पेक्षा अधिक पाऊस होणे अपेक्षित असल्याची अट टाकली आहे. त्यावर लवकरच प्रस्ताव करून शासनास पाठवा, याबाबत मी मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे.
प्रत्येक अधिकाऱ्याच्या डोक्यावर हंडा देऊ : आ.डॉ. किरण लहामटे..
जलजीवन योजनेचे कामे सुरू होऊन तीन वर्ष होत आहे तरी कामे पूर्ण होत नाही, ही बाब योग्य नाही. 2021 साली सर्वे करताना काही गोष्टी राहिल्यामुळे अधिकाऱ्यांनी चूक दुरुस्त करावी. पिण्याच्या पाण्यासाठीच्या योजना कमी पडू देऊ नका. माझे माय बहिणीच्या डोक्यावर हंडा आला ना, प्रत्येक अधिकाऱ्यांच्या डोक्यावर हंडा देऊ, असा इशारा आमदार लहामटे यांनी अधिकाऱ्यांना आमसभेत दिला.




