Ghodegaon News : अहिल्यानगर जिल्ह्यातील घोडेगाव येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. जलजीवन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणी साठवण तलावात बुडून तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेचारच्या सुमारास चार मित्र तलावात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र पाण्याची खोली आणि अंदाज न आल्याने तिघे जण पाण्यात बुडाले. या दुर्दैवी घटनेत प्रथमेश सुभाष काळे (१७), जीवन रविंद्र आव्हाड (१६) आणि शोएब आयुब शेख (१७) यांचा मृत्यू झाला आहे. तर दहा वर्षीय रिहान अन्वर शेख हा मुलगा थोडक्यात बचावला आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पहिला मृतदेह बाहेर काढताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला, त्यामुळे परिसरातील वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. रात्री उशिरापर्यंत बचाव पथकाकडून शोधमोहीम सुरू होती. या घटनेनंतर महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापनचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिक पोलीस प्रशासनही मदतकार्य करत आहे. सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी तळ ठोकला आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघातग्रस्त तलाव परिसरात सुरक्षेची उपाययोजना नव्हती का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.