Akluj Animal Market : आता आठवड्यातून दोनदा भरणार जनावरांचा बाजार! अकलूज बाजार समितीचा मोठा निर्णय
Akluj Animal Market : माळशिरस तालुक्यातील जनावरांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना मिळणार बळ; व्यापाऱ्यांच्या मागणीनंतर बाजार समितीने उचलले महत्त्वपूर्ण पाऊल.

Akluj Animal Market – अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या मागणीचा विचार करून, आता दर शुक्रवारी आणि सोमवारी जनावरांचा तसेच शेळ्या-मेंढ्यांचा बाजार भरविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांनी या निर्णयाची माहिती दिली.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या सूचनेनुसार बाजार समितीमध्ये एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बाजार समितीचे संचालक, शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आठवड्यातून दोनदा बाजार भरविण्याच्या या निर्णयामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांची मोठी सोय होणार आहे. “या निर्णयामुळे माळशिरस तालुक्यातील जनावरांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना मोठी चालना मिळेल आणि स्थानिक अर्थकारणाला गती प्राप्त होईल,” असा विश्वास सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. या निर्णयाबद्दल उपस्थित शेतकरी आणि व्यापारी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.




