Solapur Crime : धक्कादायक ! माळशिरसमध्ये तरुणाची विवस्त्र करून क्रूरपणे हत्या

सोलापूर : बीड, लातूर नंतर आता सोलापूरमधील माळशिरसमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या तरुणाला हत्या करण्याअगोदर विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याला गरम सळीचे चटके देण्यात आले. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
माळशिरस तालुक्यात पिलीव येथे आकाश अंकुश खुर्द पाटील या 28 वर्षांच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. माळशिरस-पिलीव रोडवर पिलीव हद्दीमध्ये असणाऱ्या वन विभागाच्या क्षेत्रामध्ये आकाश याचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेमध्ये आढळून आला होता. त्याच्या मृतदेहावर अनेक गंभीर जखमा होत्या, गरम लोखंडी सळईने त्याच्या शरिराला चटके देण्यात आले होते. तसंच त्याच्या तोंडातूनही रक्त येत होतं.
ही घटना समोर आली तेव्हा पिलीवसह माळशिरसमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पिलीव आऊटपोस्टचे पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आकाशची हत्या प्रेम प्रकरण किंवा अनैतिक संबधातून झाला असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एक तरुणी आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.





