Maharashtra Government : ‘तीन महिन्यांत राज्यातलं सरकार कोसळणार’; ‘या’ नेत्याने केला खळबळजनक दावा

मुंबई : काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत महायुती सरकारला बहुमत मिळाले आणि राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. या निवडणुकीत भाजपला राज्यात सर्वाधिक 132 जागा मिळाल्या शिवसेनेला 57 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला तीनही पक्ष मिळून केवळ 50 जागाच जिंकता आल्या. यानंतर अनेक नेत्यांकडून EVM वर शंका उपस्थित करण्यात आली. यादरम्यान आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.
काय म्हणाले उत्तमराव जानकर?
‘तीन महिन्यात राज्यातलं सरकार पडणार आहे, त्याचे पुरावे मी सादर केल्यावर देश गडबडून जाईल. सरकार शंभर टक्के जाणार आणि पुन्हा निवडणुका घ्यावा लागणार’ असा दावा आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे. तसेच ते पुढे म्हणाले ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा नसेल तर माळशिरस विधानसभा आणि बारामती विधानसभा मतदारसंघात बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका घेऊन दाखवा, अजित पवार दहा हजार मतांनी पराभूत होतील.
रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे आव्हानही मी स्विकारतो या देशाची आणि राज्याची व्यवस्था बदलल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर महायुतीचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





