Ajit Pawar : असा नेता पुन्हा होणे नाही – सुनील शेळके
Ajit Pawar : ...आणि असा बापमाणूस पुन्हा लाभणेही नाही

राजकारणात प्रत्येकाला एखाद्या मोठ्या नेतृत्वाच्या सावलीत काम करण्याची संधी मिळते. पण काही नेते फक्त राजकीय मार्गदर्शक नसतात, ते आयुष्य घडवणारे असतात. माझ्यासाठी अजितदादा पवार हे असेच व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी मला केवळ राजकारणात संधी दिली नाही, तर माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या आयुष्याला नवी दिशा दिली.
मी ज्या पक्षात काम करत होतो, त्या पक्षाकडून पहिल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर अजितदादा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. मुंबईत बसून त्यांनी माझी उमेदवारी जाहीर केली आणि एकच वाक्य उच्चारले – “मावळच्या जनतेला काम करणारा माणूस हवा आहे.” त्यांच्या त्या विश्वासाने माझ्या आयुष्याचा मार्गच बदलून गेला. आज मी जनतेच्या सेवेत उभा आहे, ते अजितदादांच्या विश्वासामुळेच.
मावळ तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी हजारो कोटी रुपयांचा निधी दिला. पण निधी देऊन ते कधीच मोकळे झाले नाहीत. “काम व्यवस्थित सुरू आहे ना? निधी कमी तर पडत नाही ना? लोकांना त्रास तर होत नाही ना?” अशी आपुलकीची चौकशी ते कायम करत असत. बदल्यात ते फक्त मावळचा इंद्रायणी तांदूळ हक्काने मागायचे. हा व्यवहार नव्हता, ते प्रेम, मायेची नाळ होती.
दादांच्या दारात रोज पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत लोकांची रांग असायची. त्या गर्दीत कोणी त्यांना काही देण्यासाठी आलेले मी कधी पाहिले नाही. प्रत्येकजण काहीतरी घेण्यासाठी यायचा, आणि दादा कोणालाही रिकाम्या हाताने परत पाठवत नसत. जात, धर्म, पक्ष, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव त्यांच्या मनात नव्हता. प्रत्येक माणूस त्यांच्यासाठी सारखाच होता.
आमचं नातं हे नेता-कार्यकर्ता इतकंच नव्हतं; तर ते बाप-लेकाचं होतं. दादा कधी रागवायचे, मी रुसून बसायचो. काही वेळाने त्यांचा निरोप यायचा “सुनीलला बोलावून घे रे… कुठपर्यंत आलाय विचार.” त्या एका वाक्यात माया, काळजी आणि आपुलकी दडलेली असायची.
मावळ तालुक्यात विधानसभा निवडणुकी दरम्यान अनेक राजकीय घडामोडी झाल्या, अनेकांनी पक्षाची.. दादांची साथ सोडली. पण मावळच्या सामान्य जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला, मला सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून दिले. त्या विजयानंतर दादांचा मला फोन आला.
नेहमीप्रमाणे आधी त्यांनी मला घाबरवलं आणि मग हसत म्हणाले, “लाखाच्या फरकाने विजय होतो का रे?” त्यांच्या त्या कौतुकाच्या थापेने माझे डोळे नकळत पाणावले. तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या पुरस्कारांपैकी एक होता. अजितदादांनी कधीही जाती-पातीचे, धर्माचे किंवा गरीब-श्रीमंतांचे राजकारण केले नाही. विकास, माणुसकी आणि काम करणाऱ्या माणसावर विश्वास ठेवणे हेच त्यांचे राजकारण होते. अशा नेत्याच्या परिवाराशी आमची निष्ठा ही पदासाठी नाही, तर प्रेमासाठी आणि मिळालेल्या संस्कारांसाठी कायम राहील.
दादांच्या अचानक जाण्याने माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर जशी मुलाची अवस्था होते, तशीच आमची झाली आहे. राजकारणातील आनंद, प्रेरणा आणि आधारच काळाने हिरावून नेला. पण नियतीसमोर मात्र प्रत्येकालाच नतमस्तक व्हावे लागते. काळाने माझ्या त्या लढवय्या दादालाच काळाच्या पडद्याआड नेले.
ही वेदना आजही प्रत्येक दिवस मनाला बोचत राहते. वडिलांनंतर माझे हट्ट जर कुणी प्रेमाने पूर्ण केले असतील, तर ते फक्त अजितदादांनी. तळेगाव नगर परिषदेच्या उद्घाटनाला ते येऊ शकले नाहीत, याची मला खूप खंत होती. पण माझा हट्ट जपण्यासाठी ते कामशेत येथील विठ्ठल परिवाराच्या कीर्तन महोत्सवाला स्वतः आले. माझ्या आग्रहाखातर त्यांनी खाली बसून पत्रावळीवर प्रेमाने जेवण केले. हा प्रसंग माझ्यासाठी आणि मावळच्या जनतेच्या आयुष्यभराची अमूल्य आठवण आहे.
दादा नेहमी ठामपणे म्हणायचे— “डर जाऊँ आसानी से मैं वो कश्ती नहीं, मिटा सको तुम मुझे ये तुम्हारे बस की बात,नहीं।” आज दादा आपल्यात नाहीत. पण त्यांनी दिलेला विश्वास, शिकवलेली माणुसकी, विकासाची दृष्टी आणि कार्यकर्त्यांवर केलेले अपार प्रेम हे कायम माझ्या हृदयात जिवंत राहील. असा नेता पुन्हा होणे नाही… आणि असा बापमाणूस पुन्हा लाभणेही नाही. भावपूर्ण अभिवादन!
- सुनील शंकरराव शेळके
आमदार मावळ विधानसभा
हेही वाचा :






