Ajit Pawar: अजितदादांच्या ‘दादा’ गिरीतून पिंपरी-चिंचवडचा देशभर डंका : प्रकाश गायकर

पिंपरी-चिंचवड… एकेकाळी चार गावांचा समूह असलेले हे शहर आज देशातील वेगाने विकसित होणाऱ्या महानगरांपैकी एक म्हणून ओळखले जाते. १९५४ साली हिंदुस्थान अँन्टीबायोटिक्ससारख्या औद्योगिक कारखान्याने या शहराला औद्योगिक ओळख मिळवून दिली आणि ४ मार्च १९७० रोजी स्व. अण्णासाहेब मगर यांच्या पुढाकारातून नगरपालिकेची स्थापना झाली.
या छोट्याशा सुरुवातीपासून सुरू झालेली ही वाटचाल आज १७७.३ चौ.कि.मी. क्षेत्रफळाचे, ३० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले आणि हजारो कारखान्यांनी गजबजलेले आधुनिक शहर बनले आहे. मात्र या प्रवासात एक नाव कायम अधोरेखित होतं ते म्हणजे अजितदादा पवार. या कामाच्या माणसांने आपल्या दादागिरीतून (नेतृत्वातून) पिंपरी चिंचवडला देशात अव्वल स्थान मिळवून दिले.
अजितदादांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवडचा केवळ विकास झाला नाही, तर शहराने देशभरात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अजितदादांच्या धडाडीच्या नेतृत्वाखाली या शहराचा अक्षरशः कायापालट झाला. अजितदादांच्या काळात पिंपरी-चिंचवडने विकासाची अशी झेप घेतली की, अनेक शहरांसाठी ते ‘मॉडेल सिटी’ ठरले. रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, आरोग्य सुविधा, शिक्षण व्यवस्था, सार्वजनिक वाहतूक, उद्याने, क्रीडा संकुलांची कामे मोठ्या प्रमाणावर झाली.
शहरातील बीआरटीएस (बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम) हा प्रकल्प देशातील आदर्श प्रकल्पांपैकी एक मानला गेला. ‘सारथी’ ई-गव्हर्नन्स प्रणालीमुळे नागरिकांना घरबसल्या सेवा मिळू लागल्या. प्रशासनात पारदर्शकता आणि कार्यक्षमतेचा नवा आदर्श निर्माण झाला. औद्योगिक क्षेत्रातही पिंपरी-चिंचवडने मोठी झेप घेतली. टाटा मोटर्स, बजाज ऑटो, थरमॅक्स, फोर्स मोटर्स यांसारख्या नामांकित कंपन्यांमुळे शहर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले. औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. चाकण, हिंजवडी, तळेगाव या औद्योगिक पट्ट्यांना पूरक असे हे शहर बनले.
अजितदादांच्या नेतृत्वाखाली शहराला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले. स्वच्छ भारत अभियानात देशात नववा आणि राज्यात पहिला क्रमांक, ‘बेस्ट सिटी’ पुरस्कार, ई-गव्हर्नन्ससाठी ‘मंथन पुरस्कार’, पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थेसाठी राष्ट्रीय पातळीवरील सन्मान हे सारे यश केवळ आकडेवारी नाही, तर त्या मागे असलेली दूरदृष्टी आणि काम करण्याची जिद्द होती.
पिंपरी-चिंचवडची साक्षरता ९० टक्क्यांपेक्षा अधिक झाली, झोपडपट्टी भागातही मूलभूत सुविधा पोहोचल्या, नागरिकांचे जीवनमान उंचावले हे सर्व एका सक्षम आणि ठाम नेतृत्वामुळे शक्य झाले. अजितदादांनी केवळ प्रकल्प उभारले नाहीत, तर शहराच्या भविष्यासाठी भक्कम पाया घातला.
मात्र, नियतीने या दृरदृष्टी असलेल्या नेत्याला आपल्यातून हिरावले आणि शहराच्या विकासाची गतीही मंदावली. आजही पिंपरी-चिंचवड मोठे आहे, परंतु त्या झपाट्याने होणाऱ्या विकासाची उणीव जाणवते. अनेक प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत, नवीन योजना अपेक्षित वेगाने पुढे सरकत नाहीत.
नागरिकांच्या मनात एक प्रश्न सतत उमटतो अजितदादांच्या काळातील तो वेग, ती दृष्टी, ती धडाडी कुठे हरवली? दादांच्या काळात ‘काम करा आणि दाखवा’ ही कार्यपद्धती होती. निर्णय जलद घेतले जात, अंमलबजावणी तत्परतेने होत असे. दादांच्या नंतर मात्र अनेक निर्णय प्रक्रियेत विलंब, नियोजनातील त्रुटींचा अभाव दिसून येतो. त्यामुळे शहराच्या विकासाचा रथ जणू काही थांबला आहे.
पिंपरी-चिंचवड हे केवळ औद्योगिक शहर नाही, तर लाखो नागरिकांचे स्वप्नांचे शहर आहे. या शहराला पुन्हा एकदा त्या जुन्या जोमाने पुढे नेण्यासाठी सक्षम, दूरदृष्टी असलेले आणि निर्णयक्षम नेतृत्व आवश्यक आहे. अजितदादांच्या नेतृत्वाने हे शहर काय करू शकते, हे आपण प्रत्यक्ष अनुभवले आहे. आजही नागरिकांच्या मनात अजितदादांविषयी एक वेगळीच भावना आहे, ती म्हणजे विश्वासाची. कामाचा माणूस ही प्रतिमा सहज तयार होत नाही; ती वर्षानुवर्षांच्या कामातून घडते. पिंपरी-चिंचवडच्या प्रत्येक रस्त्यात, प्रत्येक प्रकल्पात आणि प्रत्येक यशामध्ये अजितदादांची छाप दिसून येते.
शहराचा विकास हा केवळ आकडेवारीत मोजला जात नाही, तर तो नागरिकांच्या जीवनात जाणवला पाहिजे. अजितदादांच्या काळात हा विकास प्रत्येक नागरिकाला जाणवत होता. आजही तोच विकास पुन्हा अनुभवण्याची अपेक्षा नागरिक करत आहेत. पिंपरी-चिंचवडचा इतिहास सांगतो जेव्हा अजितदादांसारखे सक्षम नेतृत्व मिळाले, तेव्हा हे शहर देशात अव्वल ठरले. आणि आजचा काळ सांगतो या शहराला पुन्हा अजितदादांच्या नेतृत्वाची गरज आहे. पण आता हे शक्य नाही ही सल प्रत्यके शहरवासियाच्या मनात आहे.
– प्रकाश गायकर, बातमीदार
दैनिक प्रभात, पिंपरी चिंचवड.





