Ajit Pawar Birthday: स्व. अजितदादा अष्टपैलू नेतृत्व
Ajit Pawar Birthday महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विधिमंडळात अभ्यासपूर्ण पद्धतीने विविध योजना व समस्यांवर आपले मत प्रभावीपणे मांडत. महाराष्ट्राचे एक कणखर नेतृत्व म्हणूनही त्यांची ओळख होती. स्व.अजितदादांनी सर्वच खाती समर्थपणे सांभाळली होती.

Ajit Pawar Birthday: स्व. अजितदादा पवार यांचे कार्य हे समाजाभिमुख होते. त्यांच्या कार्याचे विविध पैलू होते. समाजकारणाबरोबरच अर्थकारण, शिक्षण, सहकार, कला, क्रीडा, उद्योग व आरोग्य, अशा विविध क्षेत्रात स्व. दादांचे योगदान मोठे होते. दादांचे सर्वसामान्य कार्यकत्यांकडे विशेष लक्ष असायचे. त्यांची नाळ विशेषत: शेतकऱ्यांशी जास्त जोडलेली होती. त्यांच्या प्रश्नांकडे ते जास्त लक्ष द्यायचे.
सत्तेत असो वा नसो, सर्वसामान्य जनतेपर्यंत विकास कामे पोचण्यासाठी ते नेहमीच तत्पर असायचे. त्यांची राजकीय वाटचाल ही राष्ट्रवादी काॅंग्रेससह सर्वच पक्षाच्या प्रेरणादायी ठरणारी आहे. पक्षातील इतर मोठ्या नेत्यांबरोबर काम करताना आपल्या अभ्यासू वृत्ती आणि प्रशासनावरील पकडीमुळे त्यांनी आपले स्थान अढळ केले होते. ध्रुव ताऱ्यासारखे महाराष्ट्रच नव्हे त्यांनी भारतीय राजकारणात आपले वर्चस्व दाखवून दिले होते.
याबरोबरच वक्तशीरपणालाही त्यांच्या जीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान होते. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला उद्योगधंद्यांच्या, सहकाराच्या माध्यमातून बळकटी देण्याचे काम स्व. अजितदादांनी केले. त्यांची कार्यशैली इतरांच्या तुलनेत वेगळी होती. सामान्य माणसांना ते आपलेसे वाटायचे. त्यामुळेच ते युवक, उद्योजक, शेतकरी यांच्या मनात आपले स्थान निर्माण करू शकले. मातीशी नाळ असलेला, दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती.
शरद पवार साहेब यांच्या कुटुंबात स्व. अजितदादांचे बालपण गेले. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, या उक्तीप्रमाणे कुटुंबातच दादांना राजकारण व समाजकारणाचे बाळकडू मिळाले. आपल्या अभ्यास, चिंतन व मननातून त्यांनी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराने मार्गक्रमण केले. स्व. दादांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली होती. ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, कामगार, विद्यार्थी, युवक यांचे विविध प्रश्न सोडविण्यावर त्यांनी भर दिला होता. म्हणूनच राजकारणातही ते आपला पाया भक्कम करू शकले होते. आजपर्यंत राजकीय वाटचालीत त्यांनी विविध खाती सांभाळली.
कृषी, फलोत्पादन, पाटबंधारे व जलसंधारण, ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, अर्थ व नियोजन, ऊर्जा इत्यादींचा समावेश यामध्ये होतो. ही सर्व खाती सांभाळत असताना त्यांनी आपल्या कामाने जनसामान्यांवर ठसा उमटवला होता. त्याच्या प्रत्येक कामात दूरदृष्टी व शिस्त यांचा प्रत्यय यायचा. महाराष्ट्राला आणि देशाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याचे त्यांचे स्वप्न होते. कोणतेही विकासाभिमुख काम करताना कोणत्याही अडचणी निर्माण झाल्या तरी त्यावर मात करण्याची त्यांची तयारी असायची. आरोप-प्रत्यारोप राजकारणात राजकारणात होत असतात. त्यांना समर्थपणे पेलण्याचे कसब स्व. अजितदादांनी आत्मसात केले होते.
महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विधिमंडळात अभ्यासपूर्ण पद्धतीने विविध योजना व समस्यांवर आपले मत प्रभावीपणे मांडत. महाराष्ट्राचे एक कणखर नेतृत्व म्हणूनही त्यांची ओळख होती. स्व.अजितदादांनी सर्वच खाती समर्थपणे सांभाळली होती. तरी जलसंपदा व पाटबंधारे मंत्री म्हणून केलेली कामे ही महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाणारी आहेत. ही कामे करताना अनेक अडचणींवर मात करून शेतीवर आधारित व उद्योगांसाठी विविध योजना राबविल्या. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जलसंधारणाची कामे केली. त्यामुळे जिरायती शेती फुललेली दिसते. सर्वसामान्य शेतकरी वर्गाला कुक्कुटपालन, पशुपालन, दुग्धविकास इत्यादी पूरक उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले. शेतकरी वर्गाला या आणि अशा शेतीउपयोगी सहकारी संस्थांमुळे स्व. अजितदादा जवळचे वाटायचे.
समाजकारणाचा ध्यास…
ग्रामविकास करतानाच समाजकारणाचा ध्यासही अजितदादांनी घेतला होता. संत गाडगेमहाराज ग्राम स्वच्छता अभियान, यशवंतराव चव्हाण पाणी समृद्धी योजना, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रम, मुलींसाठी स्वच्छता गृहे, अशा अनेक योजना राबविल्या. ग्रामविकासाला प्राधान्य देण्याबरोबरच त्यांनी शहरी भागाचाही कायापालट करून दाखवला. नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व बारामती नगरपालिका ही याची उत्तम उदाहरणे आहेत. ग्रामीण व शहरी भागातील उद्योग व्यावसायिकांना जिद्द आणि प्रोत्साहन दिले. सर्वसामान्य शेतकर्याचा मुलगा हा उद्योजक बनावा, छोटेमोठे उद्योग शेतीला पूरक त्यांनी उभारावेत, असे त्यांना नेहमी वाटायचे. त्यानुसार ग्रामीण व शहरी भागातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल ही भूमिका दादांनी नेहमी घेतली होती. ग्रामीण भागात उद्योगधंद्यासाठी लागणार्या विविध सेवा-सुविधा देण्यावर त्यांचा भर होता. त्यामुळे ग्रामीण भागातून शहराकडे होणारे स्थलांतर नोकरीसाठी व व्यवसायासाठी थांबेल, असे त्यांना नेहमी वाटायचे.
तडफदार नेतृत्व म्हणून स्व. अजितदादांची प्रतिमा राजकीय क्षेत्रात अष्टपैलू अशीच होती. आपल्या विकासकामाच्या माध्यमातून त्यांनी अधिक भक्कमपणे जपली होती. गेली पंचवीस-तीस वर्षे राजकीय क्षेत्रात त्यांनी केलेली कामे ही त्यांनी भूषवलेल्या पदांमुळे व स्वकर्तृत्वामुळे झालेली आहेत. मराठा समाजास आरक्षण देताना इतरांच्या ५२ टक्के आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये, घटनात्मक आरक्षण देण्यासाठी आम्ही सर्व सरकारला सहकार्य करण्यास तयार आहोत, अशी भूमिका दादांनी घेतली होती.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून स्व. अजितदादांनी केलेले प्रयत्न हे सर्वश्रुत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, ज्यांनी कष्ट केले, ज्यांनी प्रेरणा दिल्या त्या फुकट जाऊ नयेत, असे त्यांना नेहमी वाटत होते. स्व. अजितदादांनी सर्वतोपरी प्रयत्न करून अलीकडच्या काळात विधिमंडळात यासंदर्भात महत्त्वाची भूमिका बजावली. सरकारला विधिमंडळाचा एक ‘कणखर’ नेता म्हणून आरक्षण देण्यास भाग पाडले. मराठा समाजातील गोरगरीब जनतेच्या मुलांना शिक्षणामध्ये व नोकर्यांमध्ये त्याचा फायदा होणार आहे.
-शीतल आप्पा लोखंडे,
चेअरमन,नवजीवन उद्योग समूह, माळेगाव-बारामती





