Ajit Pawar Birthday : काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणारा नेता
Ajit Pawar Birthday पुरोगामी आणि समृद्ध, देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राचे सहावेळा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणारे स्व. अजितदादा पवार यांच्या कामाची शैली अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला स्व. अजितदादा नेहमीच कामाची संधी द्यायचे.

Ajit Pawar Birthday : स्व. उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याच्या राजकीय नकाशावरील वलयाकिंत व्यक्तीमत्व होते. निष्ठावंत, स्वाभिमानी कार्यकर्त्याला संधी देणारा नेता, अशी स्व. अजितदादांची ओळख होती. विकासकामांसाठी निधी देतानाचे दातृत्व, सर्वसमावेशक नेतृत्व, अंगभूत वैशिष्ट्यांच्या बळावर आतापर्यंत ठळकपणे दिसणारे कर्तृत्व, अशी प्रतिमा अजितदादांनी पुरोगामी महाराष्ट्रात निर्माण केली होती. विकासकामांतून त्यांनी राज्यातील सर्व घटकांचा परीघ व्यापून टाकला होता. शेकडो कार्यकर्त्यांच्या आयुष्याचे सोनं करणारे दादा, हे दादा माणूस होते. स्व. अजित दादा यांच्या प्रथम जयंतीनिमित्त त्यांचे सारे पैलू उलगडताना माझा उर रून आला आहे. स्व. दादांनी दिलेल्या संधीने माझ्या आयुष्याचा जीवनपटच बदलला आहे. हे यानिमित्त शब्दबद्ध करीत आहे.
पुरोगामी आणि समृद्ध, देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राचे सहावेळा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणारे स्व. अजितदादा पवार यांच्या कामाची शैली अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला स्व. अजितदादा नेहमीच कामाची संधी द्यायचे. याची अनेक उदाहरणे राज्यभर आहेत. मी देखील त्याचाच एक भाग आहे.
बारामती शहरालगत असलेल्या तांदुळवाडी त्यावेळची ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीचा मी वयाच्या २१ व्या वर्षी सरपंच झालो. सरपंच झाल्यानंतर मी स्व. अजितदादा यांना भेटण्यासाठी गेलो. वयाचे २१ व्या वर्षी सरपंच झालो असल्याने त्यांनी माझ्याकडे विशेष कौतुकाने पाहिले. तांदुळवाडी गावच्या विकासासाठी मदतीचे आश्वासन देत त्यांनी विकासकामांना भरीव निधी दिला. कामाची गोडधोड सुरू असतानाच तरुणांचे संघटन बांधले. त्यानंतर स्व. अजितदादा यांनी माझी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नेमणूक केली. त्यामुळे काम करण्याचा उत्साह आणखीच दुणावला. २०१२ साली तांदुळवाडी गाव बारामती नगरपरिषदेत समाविष्ट झाले. त्यानंतर जवळपास २५ हजार मतदार संख्या असणाऱ्या वाढीव हद्द क्षेत्रातून नगरसेवक पदाची संधी स्व. अजितदादा यांनी मला त्यावेळी दिली. गावपातळीवरून थेट नगरपरिषदेत काम करण्याची संधी मला मिळाल्याने कामाचा झपाटा सुरू झाला.
विकासकामांचा परीघ विस्तारत गेला. नगर परिषद हत्तवाड क्षेत्रातील विकास करणे गरजेचे आहे, ही बाब लक्षात घेऊन स्व. अजितदादा यांनी नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे तांदूळवाडी परिसराचा कायापालट झाला. तांदूळवाडी परिसरात विविध विकासकामे मार्गी लागली. त्यानंतर नगरपरिषदेत आरोग्य सभापतीपदी माझी निवड करण्यात आली.स्वच्छ सुंदर हरित बारामतीमध्ये नागरिकांच्या आरोग्य सुविधेवर लक्ष देता आले ते अजितदादा यांच्यामुळेच. २०१६- १७ मध्ये पुन्हा नगरपरिषदेची निवडणूक लागली. तांदूळवाडी गावाचा नगर परिषद हद्दीत समावेश झाला. त्यामुळेचं हा परिसर झपाट्यानं बदलून गेला. परिसराचा कायापालट झाला. सर्व सोयीसुविधा निर्माण झाल्या.
दूरदृष्टी असणारे स्व. अजितदादा यांनी माझ्याकडे पहिल्याच वर्षी उपनगराध्यक्ष पदाची धुरा दिली. त्यामुळे बारामती शहराचा हद्दवाढ क्षेत्रातील विविध विकासकामात मला सहभाग घेता आला. वयाच्या ३८ व्या वर्षी स्व. अजितदादा यांनी माझ्यावर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी टाकली. राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामती शहराध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी देण्यात आली. जात- पात, धर्म असे कोणतेही बिरूद न लावता स्व. अजितदादा यांनी मला विविध पदावर काम करण्याची संधी दिली. एवढ्या कमी वयात एवढ्या पदांवर काम करण्याची संधी केवळ स्व. अजितदादा यांच्यामुळे मिळाली. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून माझा प्रवास सुरू झाला. मात्र, रत्नपारखी असलेल्या स्व. अजितदादा यांनी माझ्या कामाची दखल घेत वेळोवेळी मला विविध पदावर काम करण्याची संधी दिली. त्यांनी संधी दिल्यानंतर बारामती शहरातील तांदुळवाडी परिसरात व हद्दवाडी क्षेत्रात जवळपास ५ हजारांहून अधिक झाडे लावण्याचा उपक्रम राबवण्यात आला.वृक्षारोपणाची चळवळ संपूर्ण शहरात राबवली. महा रक्तदान शिबिरे घेण्यात आली. त्यामध्ये हजारो बाटल्या संकलित करून गोरगरिब रुग्णांपर्यंत पोहोचविण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रात स्व. अजितदादा यांची कार्यशैली अशीच होती. त्यामुळे हजारो कार्यकर्ते स्व. अजितदादा पवार यांच्याबरोबर शेवटपर्यंत खांद्याला खांदा लावून संपूर्ण राज्यात काम करीत होते. सर्वांना बरोबर घेऊन चालणाऱ्या स्व. अजितदादा यांना प्रथम जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
हजारोंना काशीदर्शन घडविले
काशी यात्रेच्या माध्यमातून हजारो भाविकांना काशी दर्शन घडविले. एक तास प्रभागासाठी ही योजना प्रभावी ठरली. स्व. अजितदादा यांनी संधी दिल्याने हे सर्व करता आले. त्यामुळे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणारा नेता म्हणून स्व. अजितदादा नहमीच स्मरणात राहतील. केवळ बारामतीपुरतेच असे होते, असे नाही.
-जय पाटील, नगरसेवक, बारामती नगरपरिषद.





