Ajit Pawar : आधी साहेब पांघरून घालायचे अन् आता…; अजित पवारांनी काढली शरद पवारांची ‘ती’ आठवण

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनिती आखताना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. पुण्यातील या बैठकीत त्यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर सूचक विधान केले. “आधी आपल्या चुका झाकायला साहेब असायचे, आता स्वतःलाच पांघरून घालावं लागतं,” असं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्याशी असलेल्या भूतकाळातील नात्याची आठवण काढली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना निष्ठा, संयम आणि सुसंस्कृत राजकारणाचा सल्ला दिला, तसेच महायुती की स्वतंत्र लढत यावरही भाष्य केलं.
निष्ठा आणि मेहनतीवर भर
अजित पवारांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं. “ज्याच्याकडे निवडणुकीत यश मिळवण्याची क्षमता आहे, त्यालाच तिकीट मिळेल,” असं स्पष्ट करताना त्यांनी पक्षनिष्ठेवर जोर दिला. शंकर मांडेकर यांनी पक्ष सोडल्याचा आणि अशोक पवार यांनी पालकमंत्री होण्याची स्वप्ने पाहिल्याचा उल्लेख करत अजित पवार म्हणाले, “अशोक पवारला मीच पाडलं.” सुनील शेळके यांच्यावरही पक्षांतर्गत टीका झाली, पण ते निवडून आले, असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना एकाचवेळी अनेक ठिकाणी पाय ठेवण्याचा प्रयत्न न करण्याचा इशारा दिला. “निष्ठा आणि ध्येयाला प्राधान्य द्या, नाहीतर हातात काहीच राहणार नाही,” असा सल्ला त्यांनी दिला.
महायुती की स्वतंत्र लढत?
महायुतीच्या रणनीतीवर बोलताना अजित पवार म्हणाले, “महाविकास आघाडीच्या काळात आपण स्थानिक निवडणुका स्वतंत्रपणे लढलो आणि गरज पडली तेव्हा एकत्र आलो. आताही तशी परिस्थिती येऊ शकते.” पक्षाची ताकद वाढवण्यासाठी जनसंवाद आणि परिवार संवादाचे कार्यक्रम सुरू राहतील, असं त्यांनी नमूद केलं. “कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांचं दुःख समजून घ्यायचं आहे,” असं सांगत त्यांनी जनतेच्या प्रश्नांपर्यंत थेट पोहोचण्याचा आग्रह धरला. “आपल्याला दिल्लीत जाऊन कुणाला विचारण्याची गरज नाही. काँग्रेस, भाजप किंवा पवार साहेबांच्या पक्षाला दिल्लीत विचारावं लागतं,” असं म्हणत त्यांनी पुन्हा शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
“आधीचा आणि आताचा अजित पवार वेगळा”
वयानुसार मॅच्युरिटी आल्याचं सांगताना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना संकोच न बाळगता संपर्क साधण्याचं आवाहन केलं. “आधी चुका झाल्या तर साहेब पांघरून घालायचे, आता स्वतःलाच सांभाळावं लागतं,” असं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्याशी असलेल्या पूर्वीच्या नात्याचा उल्लेख केला. यावेळी एका कार्यकर्त्याने “चुलता-पुतण्या” असा उल्लेख केला, तेव्हा अजित पवारांनी हसत त्याला थांबवत म्हटलं, “चुलता-पुतण्याचं नातं नको सांगू, आधीचंही नको आणि आताचंही नको!” यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.





