Sharad Pawar: जिरायती भाग शंभर टक्के बागायत करता आला नाही, याची खंत : शरद पवार
Sharad Pawar: दुष्काळी परिस्थितीची पाहणी तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी शरद पवार यांची मोरगाव येथे भेट

मोरगाव : बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील गावांना शेतसिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुरंदर उपसा सिंचन व जानाई-शिरसाई सिंचन योजना राबविण्यात आल्या. या योजनांमुळे अनेक गावांना पाण्याचा आधार मिळाला, ऊसासारखी पिके घेणे शक्य झाले; मात्र जिरायती भाग शंभर टक्के बागायत करता आला नाही, याची खंत आहे, अशी भावना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.
बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी शरद पवार यांनी मोरगाव येथे भेट दिली. यावेळी मयुरेश्वर मंगल कार्यालयात आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
पवार म्हणाले, जिरायती भागातील शेतकऱ्यांना पाण्याचा आधार मिळावा यासाठी पुरंदर उपसा सिंचन आणि जानाई-शिरसाई सिंचन योजना राबविण्यात आल्या. पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी मोरगावसह परिसरातील गावांमध्ये पोहोचल्याने शेतीला मोठा आधार मिळाला. अनेक शेतकऱ्यांना ऊसासारखी पिके घेणे शक्य झाले. मात्र अजूनही या भागातील शंभर टक्के क्षेत्र बागायत झालेले नाही, ही खंत कायम आहे.
यंदाच्या हवामान परिस्थितीचा परिणाम काही भागांवर झाला आहे. एल निनोच्या प्रभावामुळे पावसाच्या परिस्थितीत बदल झाला असून, त्याचा फटका आपल्या भागालाही बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण स्वतः मुख्यमंत्री यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडल्या.
त्यातील काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरी सर्व मागण्या शंभर टक्के मान्य झालेल्या नाहीत. मात्र संकटाच्या काळात मार्ग काढणे आवश्यक असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले पाहिजेत, असे पवार यांनी सांगितले.
दरम्यान, मोरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून सुमारे २० लाख रुपये उभे करून पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी सुमारे तीन हजार फूट अंतरापर्यंत नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचाही यावेळी उल्लेख करण्यात आला. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पाण्यासाठी केलेला हा प्रयत्न दुष्काळाच्या परिस्थितीत सामूहिक इच्छाशक्तीचे उदाहरण ठरत आहे.





