Pune News | पुणेकरांसाठी द पुणे फाउंटन पेन शो ; उद्यापासून देश- विदेशातील दुर्मिळ पेनचे प्रदर्शन

प्रभात वृत्तसेवा
पुणे – फाउंटन पेनवर विशेष प्रेम असणाऱ्या मंडळींना भारतातील एकमेव फाउंटन पेन शो म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ‘द पुणे फाउंटन पेन शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. द इंक अँड पेन्स यांच्यातर्फे येत्या २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान या प्रदर्शनाचे आयोजन फर्गसन रोडवरील ज्ञानेश्वर पादुका चौकातील वन प्लेस येथे करण्यात येणार आहे.२६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश दिलीप कर्णिक यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
या वेळी भाजपचे पुणे शहर उपाध्यक्ष मनोज खत्री उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनाची वेळ सकाळी १०.३० ते संध्याकाळी साडेआठ अशी असून, ते सर्वांसाठी विनामूल्य आहे.प्रदर्शनात भारतीय, विदेशी बनावटीची नवीन आकर्षक आणि दुर्मिळ शाई पेन्स, उच्च प्रतीच्या विविध रंगांतील शाई, शाई पेन्सचे सुटे भाग पाहता येतील. यंदा लोटस पेन्सचे अरुण सिंघी यांनी तयार केलेल्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्यावरील पेनची स्पेशल एडिशन उपलब्ध आहे, अशी माहिती द इंक अँड पेन्सच्या संचालिका रश्मी नगरकर-पिल्ले यांनी दिली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले आहे. वय वर्षे १० पासून ते जेष्ठ नागरिकांना यामध्ये भाग घेता येईल. सहभागींनी घरून शाई पेनने भारताचे राष्ट्रगीत (जन गण मन) लिहून आणायचे आहे. सहभागी होणाऱ्या व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेचा निकाल सात नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.




