Sharad Pawar: “माझं मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं झालंय!” एमपीएससी आंदोलनावर शरद पवारांची मोठी मध्यस्थी
Sharad Pawar: "विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून संवाद साधणे सरकारची जबाबदारी"; शरद पवारांचे राज्य सरकार आणि शिक्षण संस्थांना तोडगा काढण्याचे आवाहन.

Sharad Pawar- एमपीएससी विषयावर सध्या सुरू असलेल्या आंदोलनातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री चर्चा करतील. माझे त्यांच्याशी बोलणे झाले आहे, अशी माहिती ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी शहराध्यक्ष विशाल तांबे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा आणि भरती प्रक्रियेसंबंधित विविध मुद्द्यांवरून पुण्यात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र सरकारला आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे आवाहन केले आहे, तसेच विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि मागण्या गांभीर्याने ऐकून घेऊन संवादातून तोडगा काढला पाहिजे. विद्यार्थ्यांना न्याय देणे, ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे, असेही पवार म्हणाले. पुणे, मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागांतील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष दिसून येत आहे.
अशा परिस्थितीत, राज्य सरकार आणि संबंधित शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. कोणतेही प्रश्न संवाद आणि चर्चेद्वारे सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी काही मागण्यांसाठी पुण्यात आंदोलन सुरू केले आहे. हे लक्षात घेऊन, राज्य सरकारने आणि शैक्षणिक संस्थांनी तोडगा काढण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, असे पवार म्हणाले. या विषयावर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधला.
ते नागपूरमध्ये आहेत मुंबईत परतल्यानंतर याप्रकरणी विद्यार्थ्यांशी बोलण्यास सांगितले. गरज पडल्यास उमेदवारांसोबत बैठक घेण्याची तयारीही त्यांनी दर्शवल्याचे, पवार म्हणाले. एमपीएससी अध्यक्ष हे घटनात्मक पद असून, त्यांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया राज्य सरकारच्या अधिकारक्षेत्रात येत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितल्याचे पवार यांनी नमूद केले. आंदोलन लांबवण्याऐवजी दोन्ही पक्षांनी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण करू शकेल, असा तोडगा काढला पाहिजे, यावर पवार यांनी जोर दिला.






