संगमनेर – लहान मुलांना खेळण्यासाठी असलेल्या रेल्वेचा अपघात झाला असून यात सात वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना संगमनेर शहरातील नगर परिषदेच्या नेहरू उद्यानात रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.
नगर परिषदेच्या नेहरू विद्यानात गेल्या अनेक वर्षांपासून लहान मुलांसाठी डिझेलवर चालणारी रेल्वे आहे. तिला चाचा नेहरू एक्सप्रेस असे नाव देण्यात आले आहे. एक ते सात वर्षांखालील बालकांना पाच रुपये आणि प्रौढांना दहा रुपये तिकीट दर आकारून सफर घडविली जाते. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजे दरम्यान नेहमीप्रमाणे रेल्वे गाडी लहान मुलांना घेऊन चालत असताना रेल्वे रुळावरून घसरली. यात विजय मारुती शिंदे (वय ७, रा.संजय नगर, संगमनेर) हा जखमी झाला असून, त्याला लोणी येथे उपचारासाठी हलविण्यात आले. अपघातासाठी रेल्वे चालक व नगरपालिका प्रशासन यांना दोषी धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संगमनेरातील नागरिकांकडून होत आहे
नेहरू उद्यानामध्ये लहान मुलांसाठी असलेल्या छोट्या रेल्वेचा अपघातामुळे एक छोटा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्या मुलाचे वडील हयात नाही. त्याला त्याची आजी संभाळते. त्याची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट असल्याने त्या मुलाचा उपचार करण्यासाठी ते सक्षम नाही. नगरपालिका प्रशासनाने त्या मुलाचा अपघाताबाबत सर्व उपचार खर्च करावा, अन्यथा मुलाच्या कुटुंबातील व्यक्ती गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही.
अमर कतारी, माजी शहरप्रमुख (उबाठा)