AFG vs SA : द. अफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, ‘या’ स्टार खेळाडूचं कमबॅक…

Afghanistan squad for ODI series against South Africa : अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ हा ओल्या मैदानामुळे रद्द करण्यात आला आहे. या सामन्याचा टाॅस देखील झालेला नाही. शुक्रवारी या कसोटीचा अखेरचा दिवस असून पाऊस आणि ओले मैदान यामुळे सामना सुरू होण्याची आशा जवळपास संपुष्टात आलेली आहे. असं असताना दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय (वनडे,ODI) सामन्यांच्या मालिकेसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट संघाला 18 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत, ज्यासाठी अफगाण क्रिकेट बोर्डाने 12 सप्टेंबर रोजी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी अफगाणिस्तानच्या संघात त्यांचा स्टार फिरकीपटू गोलंदाज राशिद खानचे पुनरागमन होणार आहे, जो 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषकानंतर प्रथमच या फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सलामीवीर इब्राहिम झद्रान आणि फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमान हे संघाचा भाग असणार नाहीत, ज्यांची दुखापतीमुळे निवड झालेली नाही.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अफगाणिस्तान संघात इब्राहिम झद्रानच्या जागी अब्दुल मलिकचा कव्हर प्लेयर (बदली खेळाडू) म्हणून समावेश करण्यात आला आहे, ज्याने अलीकडच्या काळात लिस्ट ए क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे. तसेच आत्तापर्यंत 7 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या दरवीश रसूलीचीही देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे या एकदिवसीय मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली आहे.
संघाची घोषणा करण्यासोबतच अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ नसीब खान म्हणाले की, “पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे यजमानपद मिळणे ही अफगाणिस्तान क्रिकेटसाठी मोठी उपलब्धी आहे. आफ्रिका एक मजबूत आणि बलाढ्य संघ आहे आणि अशा संघाविरूध्द एकदिवसीय मालिका खेळण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
मालिकेचे वेळापत्रक : दोन्ही देशांमध्ये पहिला वनडे सामना 18 सप्टेंबरला, दुसरा वनडे सामना 20 सप्टेंबरला आणि तिसरा वनडे सामना 22 सप्टेंबरला होणार आहे. ही संपूर्ण मालिका युएईतील शारजाह क्रिकेट मैदानावर पार पडणार आहे. तसेच भारतीय प्रमाणवेळेनुसार सर्व सामने संध्याकाळी 5.30 वाजता सुरू होणार आहेत.
Happy with our Squad for the @ProteasMenCSA ODIs? 🏏
🔗: https://t.co/J6TIZnLWIT#AfghanAtalan | #AFGvSA | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/rFBh6Et27l
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 12, 2024
अफगाणिस्तानचा 17 सदस्यीय संघ : हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमत शाह, रहमानुल्लाह गुरबाज, इकराम अलिखिल, अब्दुल मलिक, रियाज हसन, दरविश रसूली, अजमतुल्लाह उमरजई, मोहम्मद नबी, गुलबदीन नईब, राशिद खान, नांगेयालिया खारोटे, एएम गजनफर, फजलहक फारूकी, बिलाल सामी, नवीद जादरान, फरीद अहमद.





