AFG vs SA 2nd ODI : अफगाणिस्तानचा विजयी धडाका सुरूच, द.आफ्रिकेचा सलग दुसरा पराभव करत रचला इतिहास…

Afghanistan vs South Africa 2nd ODI : अफगाणिस्तान संघासाठी 2024 हे वर्ष त्यांच्या क्रिकेट इतिहासातील आतापर्यंतचे सर्वोत्तम वर्ष ठरले आहे. अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 177 धावांनी जिंकून मालिकेत आता 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. यासह अफगाणिस्तानने इतिहास रचला आहे. एकदिवसीय मालिकेत त्यांनी प्रथमच दक्षिण आफ्रिकेविरूध्द मालिका जिंकली आहे.
अफगाणिस्तानने चौथ्यांदा एकदिवसीय मालिका जिंकण्यात यश मिळविले आहे. यापूर्वी त्यांनी बांगलादेश, झिम्बाब्वे आणि आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली होती. रहमानुल्लहा गुरबाज आणि राशिद खान हे बांगलादेशच्या विजयाचे शिल्पकार ठरले. गुरबाजनं फलंदाजीत शतकी खेळी केली तर राशिद 5 विकेट घेतल्या. राशिद खान हा सामन्याचा मानकरी ठरला.
𝐀𝐅𝐆𝐇𝐀𝐍𝐈𝐒𝐓𝐀𝐍 𝐖𝐈𝐍! 🙌#AfghanAtalan have put on a remarkable all-round performance to beat South Africa by 177 runs in the 2nd ODI and take an unassailable 2-0 lead in the series. 👏
Congratulations on the historical achievements, Atalano! 🤩
#AFGvSA pic.twitter.com/YEFo1ouinK— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 20, 2024
गुरबाजची शतकी खेळी..
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अफगाणिस्तानचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. या कालावधीत त्याने 50 षटकांत 4 गडी गमावून 311 धावा केल्या. अफगाणिस्तानसाठी गुरबाजने शानदार शतक झळकावले. त्याने 110 चेंडूंचा सामना करताना 10 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 105 धावा केल्या. याव्यतिरिक्त रहमत शाह आणि अजमतुल्लाने अर्धशतकी खेळी केल्या. रहमतने 66 चेंडूत 50 धावा करत बाद झाला. अजमातुल्लाह ओमरजईने 50 चेंडूचा सामना करताना 5 चौकार आणि 6 षटकाच्या मदतीने नाबाद 86 धावांची स्फोटक खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, नांद्रे बर्जर, नकाबा पीटर आणि एडन मार्कराम यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
आफ्रिकन संघ 34.2 षटकातच गडगडला…
अफगाणिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा सामना करताना आफ्रिकेचा संघ 34.2 षटकात 134 धावांवरच गडगडला. दक्षिण आफ्रिकेच्या एकाही खेळाडूला अर्धशतक झळकावता आले नाही. त्याच्यासाठी कर्णधार टेंबा बावुमाने सर्वाधिक 38 धावा केल्या. टोनी डी जॉर्जी 31 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. रीस हेंड्रिक्सला 17 धावा तर एडन मार्करामला 21 धावा करता आल्या. अशा प्रकारे संपूर्ण संघ 34.2 षटकातच आटोपला.
राशिदने घेतल्या 5 विकेट…
अफगाणिस्तानसाठी राशिद खान आणि नांगेलिया खरोटे यांनी घातक गोलंदाजी केली. रशीदलाही सामनावीर म्हणून निवडण्यात आले. त्याने 9 षटकात फक्त 19 धावा देत 5 बळी घेतले. त्याने टोनी डी जोर्गी, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, कील व्हेरिन आणि विआन मुल्डर यांची शिकार केली. खरोटेने 6.2 षटकात 26 धावा देत 4 बळी घेतले. अजमातुल्लाह ओमरजईनेही एक बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक –
अफगाणिस्तान 311/4(50) :रहमानुल्लहा गुरबाज 105(110), अजमातुल्लाह ओमरजई 86*(50), रहमत शाह 50(66), एडन मार्करम 1/20(4), लुंगी एनगिडी 1/50(10)
दक्षिण आफ्रिका : 134/10(34.2) : टेंबा बावुमा 38(47), टोनी डी जॉर्जी 31(44), एडन मार्करम 21(30) राशिद खान 5/19(9), नांगेलिया खरोटे 4/26(6.2), अजमातुल्लाह ओमरजई 1/17(3)





