AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्ताननं केला मोठा उलटफेर, दक्षिण आफ्रिकेचा 6 विकेट्सने उडवला धुवा…

Afghanistan vs South Africa 1st ODI : अफगाणिस्तानने मोठा उलटफेर केला आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी राखून पराभव केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अफगाणिस्तानने प्रथम दक्षिण आफ्रिकेला अवघ्या 106 धावांवर गुंडाळले होते. यानंतर त्यांनी दिलेले लक्ष्य अवघ्या 26 षटकांत गाठत सहज सामना जिंकला.
त्याच्यासाठी गोलंदाजीत फजलहक फारुकी आणि अल्लाह गझनफर यांनी अप्रतिम गोलंदाजी केली तसेच फलंदाजीत गुलबदिन नायबने 34 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा सामना शारजाह येथे खेळला गेला. अफगाणिस्तानने प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत इतिहास रचला आहे. आता उभय संघांमधील या वनडे मालिकेतील दुसरा सामना 20 सप्टेंबर रोजी शारजाच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.
History in Sharjah! 🚩#AfghanAtalan have delivered a stellar performance to defeat South Africa for the first time in international cricket and take the 1st match of the ongoing ODI series.
Congratulations to the team and the entire nation! 👏#GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/h3iRwRQiNz
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 18, 2024
एडन मार्करामच्या नेतृत्वाखालील आफ्रिकन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. यादरम्यान अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी कहर केला आणि 33.3 षटकात 106 धावांवरच आफ्रिकेला गुंडाळलं.संघाकडून विआन मुल्डरने अर्धशतक झळकावले. त्याने 84 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार आणि 1 षटकारासह सर्वाधिक 52 धावा केल्या. याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला विशेष कामगिरी करता आली नाही.
अफगाणिस्तानच्या गोलंदाजीबदल बोलयाचे झाले तर फारुकीने 7 षटकात केवळ 35 धावा देत 4 बळी घेतले. त्याने एक मेडन ओव्हरही टाकली. फारूकी हा सामनावीर ठरला. अल्लाह गझनफरने 10 षटकात 20 धावा देत 3 बळी घेतले. त्याने 2 मेडन षटके टाकली. राशिद खानने 8.3 षटकात 30 धावा देत 2 बळी घेतले. त्यानेही 2 मेडन ओव्हर्स टाकल्या.
अफगाणिस्तानने प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ टी-20 विश्वचषक 2024चा उपविजेता होता. पण शारजाहमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध त्यांनी सपशेल शरणागती पत्करली.दक्षिण आफ्रिकेने दिलेले लक्ष्य अफगाणिस्तानने अवघ्या 26 षटकांत पूर्ण केले.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली नाही, ज्यात रहमानउल्ला गुरबाजच्या रूपाने त्यांची पहिली विकेट पडली. गुरबाज शून्यावरच माघारी परतला. यानंतर अफगाणिस्तानने 18 षटकात 60 धावांपर्यत पोहचेपर्यंत आणखी तीन विकेट गमावल्या होत्या. यादरम्यान रहमत शाह 8, रियाज हसन 16 आणि कर्णधार शाहिदी 16 धावा काढून माघारी परतले.
त्यानंतर ओमरझाईला गुलबदिन याला नायबची साथ लाभली आणि दोघांनीही आक्रमक फलंदाजी करत अफगाणिस्तान संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. ओमरझाईने 36 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 25 धावांची तर गुलबदिन नायबने 27 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 34 धावांची खेळी केली. आफ्रिकेकडून गोलंदाजीमध्ये ब्योर्न फॉर्च्युइनने 2 तर एडन मार्कराम आणि लुंगी एनगिडीने प्रत्येकी 1 बळी घेतला.





