Afghanistan squad announce for T20I World Cup 2026 : आगामी आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ साठी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व स्टार लेगस्पिनर राशिद खान करणार असून, युवा फलंदाज इब्राहिम जादरान याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वेस्ट इंडिजविरुद्ध यूएईमध्ये होणाऱ्या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठीही हाच संघ मैदानात उतरणार आहे. महत्त्वाचे बदल आणि पुनरागमन – या संघात अनुभवी अष्टपैलू गुलबदीन नाइब आणि वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक यांचे पुनरागमन झाले आहे. मधल्या फळीतील फलंदाज शाहिदुल्लाह कमाल आणि यष्टिरक्षक मोहम्मद इशाक यांनी संघातील आपले स्थान टिकवून ठेवले आहे. तसेच, युवा वेगवान गोलंदाज अब्दुल्ला अहमदजई याला मुख्य संघात संधी मिळाली आहे. दुखापतीमुळे किंवा इतर कारणांमुळे बाहेर असलेल्या फजल हक फारूकी आणि मुजीब उर रहमान यांचेही संघात पुनरागमन झाले आहे. निवडीबाबत काय म्हणाले अधिकारी? अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ नसीब खान म्हणाले “मागील विश्वचषकात आमच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी केली होती. यंदा आशियाई परिस्थितीत स्पर्धा होत असल्याने आम्हाला आणखी चांगल्या निकालाची अपेक्षा आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका आम्हाला संघाचा समतोल साधण्यासाठी आणि विश्वचषकाच्या तयारीसाठी मदत करेल.” हेही वाचा – Sarfaraz Khan : सर्फराझ खानचा विजय हजारे ट्रॉफीत शतकी धमाका! रोहित शर्माचा मोडला खास विक्रम मुख्य निवडकर्ता अहमद शाह सुलेमानखिल म्हणाले, “गुलबदीन नाइब हा मोठ्या सामन्यांचा खेळाडू आहे. त्याच्या आणि नवीन-उल-हकच्या येण्याने आमची गोलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. मुजीबच्या समावेशामुळे ए.एम. गजनफरला बाहेर ठेवण्याचा निर्णय कठीण होता, पण अनुभवाला प्राधान्य दिले आहे.” अफगाणिस्तानचे आगामी वेळापत्रक- विश्वचषकापूर्वी अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात यूएईमध्ये १९, २१ आणि २२ जानेवारी रोजी टी-२० मालिका खेळवली जाईल. यानंतर टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील त्यांचा पहिला सामना ८ फेब्रुवारी चेन्नई येथे न्यूझीलंडविरुद्ध होईल. हेही वाचा – Ruturaj Gaikwad : कॅप्टन्सी इनिंग! ऋतुराजच्या शतकाने उत्तराखंडला नमवलं; महाराष्ट्राचा दिमाखदार विजय टी-२० विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा १५ सदस्यीय संघ: राशिद खान (कर्णधार), इब्राहिम झाद्रान (उपकर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (यष्टिरक्षक), मोहम्मद इशाक (यष्टिरक्षक), सेदिकुल्लाह अटल, दरविश रसूली, शाहिदुल्लाह कमाल, अजमतुल्लाह उमरजई, गुलबदीन नाइब, मोहम्मद नबी, नूर अहमद, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, फजल हक फारूकी, अब्दुल्ला अहमदजई. राखीव खेळाडू: ए.एम. गजनफर, एजाज अहमदजई आणि जिया उर रहमान शरीफी.