AFG vs SA 3rd ODI : पराभवानंतरही अफगाणिस्तानने रचला इतिहास, वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केली ‘ही’ कामगिरी..

AFG vs SA 3rd ODI : अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आता संपली आहे. मालिकेतील सलग दोन सामने गमावल्यानंतर अखेर दक्षिण आफ्रिकेने तिसरा आणि अंतिम सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेने तिसरा एकदिवसीय सामना 7 गडी राखून जिंकला. यासह अफगाणिस्तानने ही तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली आहे आणि अफगाणिस्तानने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच अफगाणिस्तान संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकली आहे. सलग दोन सामने जिंकून अफगाणिस्तानने मालिका जिंकली होती पण तिसरा सामना जिंकून संघाला दक्षिण आफ्रिकेला क्लीन स्वीप करायचे होते, मात्र ते होऊ शकले नाही. तिसरा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीपपासून स्वतःला वाचवले.
असा झाला तिसरा सामना…
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो चुकीचे सिद्ध झाला. तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा संघ 34 षटकांत अवघ्या 169 धावांत गारद झाला. अफगाणिस्तानकडून सलामी देणाऱ्या रहमानउल्ला गुरबाजने सर्वात मोठी खेळी खेळली आणि 94 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 89 धावा केल्या. याशिवाय आणखी दोनच फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला. उर्वरित 8 फलंदाजांनी एकेरी धावा केल्या. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, नाकाबा पीटर आणि फेहलुकवायो यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. ब्योर्न फॉर्च्युइनने उर्वरित 1 बळी घेतला.
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 33 षटकांत 3 गडी गमावून 170 धावांचे लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेसाठी एडन मार्करमने 67 चेंडूत नाबाद 69 धावांची खेळी केली. मार्करामने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 3 शानदार षटकार मारले. यावेळी ट्रिस्टन स्टब्सने त्याला साथ दिली. स्टब्सने 42 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 26 धावा केल्या. मार्करम आणि स्टब्स यांनी 89 चेंडूत 90 धावांची भागीदारी केली आणि संघाला विजयी मार्गावर नेले. यादरम्यान अफगाणिस्तानकडून फरीद अहमद, मोहम्मद नबी आणि अल्लाह गझनफर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
मालिकेत गुरबाजची चमकदार कामगिरी…
अफगाणिस्तानकडून फलंदाजी करताना रहमानउल्ला गुरबाजने तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा अप्रतिम खेळी खेळली. गुरबाजने 89 धावांची खेळी केली. मात्र, अफगाणिस्तानच्या इतर कोणत्याही फलंदाजाने त्याला साथ दिली नाही. गुरबाजला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. इतकंच नाही तर गुरबाजने संपूर्ण मालिकेत चांगली फलंदाजी केली, त्याने तीन सामन्याच्या मालिकेत 17 चौकार अन् 7 षटकारासह एकूण 194 धाव केल्या.ज्यामुळे त्याला मालिकावीर म्हणून निवडण्यात आलं.





