Allah Ghazanfar : पदार्पणही नाही पण आशिया कपसाठी सज्ज! भारतासह सर्वांसाठी धोक्याची घंटा, कोण आहे ‘हा’ मिस्ट्री स्पिनर?

Mystery Spinner Allah Ghazanfar : आशिया कप 2025 ची सुरुवात क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण करत आहे. सर्व संघांची घोषणा झाली असून, अफगानिस्ताननेही आपला तगडा संघ जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, या संघात 19 वर्षीय युवा स्पिनर अल्लाह गझनफर याला स्थान मिळाले आहे, ज्याने अद्याप टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. तरीही, या नवख्या खेळाडूची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
कोण आहे मिस्ट्री स्पिनर अल्लाह गझनफर –
अल्लाह गझनफरने अद्याप टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नसला, तरी त्याने अफगानिस्तानकडून एक कसोटी आणि 11 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 25 विकेट्स घेतल्या आहेत. गझनफर हा मिस्ट्री गोलंदाज असून, त्याच्याकडे विविध प्रकारे फिरकी गोलंदाजी करण्याचे कौशल्य आहे. त्यामुळे तो कोणत्याही संघासाठी धोकादायक ठरू शकतो.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा आहे खेळाडू –
आयपीएल 2025 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने गझनफरला 4.8 कोटी रुपयांना खरेदी केले. मात्र, दुखापतीमुळे तो संपूर्ण हंगाम खेळू शकला नाही. याआधी तो २०२४ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा संघाचा भाग होता. त्यामुळे केकेआरही त्याला पुन्हा खरेदी करण्यास उत्सुक होते, परंतु मुंबईने बाजी मारली. गझनफर यापूर्वी 2024 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा भाग होता, जिथे त्याला मुजीब उर रहमानच्या जागी संघात स्थान मिळाले होते.
वेगवान गोलंदाज ते मिस्ट्री स्पिनर –
अल्लाह गझनफरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात जलद गोलंदाज म्हणून केली होती. मात्र, अफगानिस्तानचा माजी कर्णधार दौलत अहमदजई याने त्याला मिस्ट्री स्पिनर बनवले. 2024 च्या अंडर-19 विश्वचषकात गझनफरने चार सामन्यांत आठ विकेट्स घेत जबरदस्त कामगिरी केली होती. या यशानंतर त्याला सिनियर संघात संधी मिळाली. आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याने पदार्पण केले आणि सातत्यपूर्ण कामगिरी केली.
इमर्जिंग आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंका अ संघाविरुद्ध त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा पुरस्कार मिळाला, जिथे अफगानिस्तानने विजेतेपद पटकावले. आशिया कप 2025 मध्ये गझनफरच्या मिस्ट्री फिरकी गोलंदाजीची सर्वांना उत्सुकता आहे. त्याच्या प्रतिभेचा उपयोग अफगानिस्तानला कितपत होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.





