सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रतिनिधी, सातारा जिल्हा कार्यकारिणीसह सर्व तालुका कार्यकारिणी, फ्रंटल सेल, विविध आघाड्यांच्या सुमारे एक हजारांहून अधिक पदाधिकाऱ्यांची शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्रे घेण्यात आली असून ही प्रतिज्ञापत्रे बुधवारी (दि. 5) मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत सादर करण्यात येणार आहेत. या बैठकीत जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.
अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. दोन्ही गटांकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र घेण्यात आले. मंगळवारी दिवसभर जिल्हा व तालुकास्तरावर ही प्रक्रिया सुरु होती. राष्ट्रवादी भवनात जिल्हाध्यक्ष सुनील माने, बाळासाहेब सोळसकर, समिंद्रा जाधव, राजकुमार पाटील, पूजा जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी या कामात व्यस्त होते. सायंकाळपर्यंत जिल्ह्यात एक हजारांहून अधिक पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे घेण्यात आली आहेत.
ही शपथपत्रे बुधवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत सादर केली जाणार असून जिल्ह्याच्यावतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.
शरद पवार यांच्या सोमवारच्या दौऱ्यामुळे जिल्हा राष्ट्रवादीत चैतन्य निर्माण झाले असून तळागाळातील कार्यकर्ते शरद पवार यांच्याविषयी आदर व्यक्त करत आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही मोठी एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बुधवारी मुंबई येथे होणाऱ्या बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जाणार असून त्यादृष्टीने पक्षाच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे.
अजित पवार व समर्थकांचा निषेध
मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा सदस्य असून माझ्याकडे पक्षाचे पद आहे. माझा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या संविधानावर पूर्ण विश्वास आणि निष्ठा आहे. मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदर्शावर आणि तत्वांवर माझी बिनशर्त निष्ठा ठेवतो. मी असेही सांगतो की राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जयंत पाटील हेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आणि राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाला माझा मनापासून, बिनशर्त व अटळ पाठिंबा आहे. पक्षाच्या घटनेबाबत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत तसेच पक्षासोबत विश्वासघात करणाऱ्या अजित पवार व त्यांच्या सहकारी आमदारांच्या कारवायांचा मी निषेध करीत आहे, असा मजकूर प्रतिज्ञापत्राद्वारे करून त्यावर संबंधित पदाधिकाऱ्यांची सही घेण्यात आली आहे. सर्वच तालुक्यातील पदाधिकाऱ्यांकडून अशी प्रतिज्ञापत्रे घेण्यात आली आहेत.