Adani Group Name: शासकीय टाकीवर ‘अदानी’चं नाव कशाला? माणकीवलीत तरुणाचे बेमुदत उपोषण सुरू
Adani Group Name: पाऊस थांबताच तीन ते चार दिवसांत अदानी समूहाचे नाव हटवले जाईल; सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांचे उपोषणकर्त्यांना आश्वासन.

Adani Group Name – जलजीवन मिशनअंतर्गत उभारलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर अदानी समूहाचे नाव टाकण्यात आल्याच्या निषेधार्थ माणकीवली येथील आशिष गायकवाड यांनी ग्रामपंचायतीविरोधात बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले. शासकीय योजनेअंतर्गत उभारलेल्या पाण्याच्या टाकीवर खासगी कंपनीचे नाव का टाकण्यात आले, असा सवाल करत त्यांनी हे नाव तात्काळ हटविण्याची मागणी केली आहे.
माणकीवली ग्रामपंचायत हद्दीतील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलजीवन मिशनच्या टाकीचे रंगकाम खराब झाल्यानंतर अदानी एसीसी समूहाकडून रंगकाम करून देण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीला मिळाला. सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी सर्वानुमते त्यास मंजुरी दिली. त्यानंतर टाकीचे रंगकाम करण्यात आले आणि त्यावर अदानी समूहाचे नाव टाकण्यात आले.
या प्रकाराला आशिष गायकवाड यांनी आक्षेप घेत ग्रामपंचायतीकडे जाब विचारला. तसेच माहितीच्या अधिकारातून माहिती मागविली. मात्र, समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचा आरोप करत त्यांनी अखेर ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. त्यांच्या आंदोलनाला परिसरातील नागरिक आणि तरुणांकडून पाठिंबा मिळत आहे.
अॅड. सुजल गायकवाड, डॉ. संतोष सदावर्ते, अजय भारती, सूरज ठोंबरे, अक्षय दबडे, निशांत देशमुख, आकाश दबडे, परेश ठोंबरे, श्रेयश पाटील, पूर्वेश पाटील, अक्षय पाटील, राज पाटील, ऋतिक पाटील, सुजित गायकवाड, करन ठोंबरे, पारस देशमुख, काव्य ठोंबरे, संदेश ठोंबरे, संकेत देशमुख यांच्यासह अनेकांनी उपोषणाला पाठिंबा दिला.
“अदानी एसीसी समूहाकडून रंगकाम करून देण्याचा प्रस्ताव आला होता. ग्रामपंचायतीचा आर्थिक भार कमी व्हावा, हा त्यामागचा उद्देश होता. कोणताही आर्थिक हेतू नव्हता. पावसामुळे नाव हटविता आले नाही. पाऊस थांबल्यानंतर तीन-चार दिवसांत रंगरंगोटी करून अदानी समूहाचे नाव हटविण्यात येईल.”
– सखुबाई कडाले, ग्रामविकास अधिकारी
“उपोषणकर्त्याशी चर्चा करून पाऊस थांबल्यानंतर नाव हटविण्यात येईल, असे पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घ्यावे.”
– बाळकृष्ण वाघमारे, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत माणकीवली





