C.R.Patil : जलजीवन मिशनच्या कामांना गती द्या; मंत्री सी. आर. पाटील यांचे निर्देश
केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून जलजीवन मिशनअंतर्गत महाराष्ट्रात सुरू असलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील (C.R.Patil) यांनी दिले.

C.R.Patil : केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून जलजीवन मिशनअंतर्गत महाराष्ट्रात सुरू असलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील (C.R.Patil) यांनी काल येथे दिले. जलजीवन मिशनअंतर्गत सुरु असलेल्या कामांसंदर्भात त्यांनी महाराष्ट्रातील खासदारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
महाराष्ट्र सदन येथील सभागृहात आयोजित या संवाद सत्रास (C.R.Patil) केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री व्ही. सोमण्णा, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले तसेच महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते.
ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे सुरक्षित, पुरेसे आणि नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या या मिशनच्या कामांना गती देण्यासाठी आयोजित बैठकीदरम्यान महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मिशनच्या अंमलबजावणीचा, प्रलंबित कामांचा, पाणीपुरवठा योजनांचा तसेच ग्रामीण भागातील प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याशी संबंधित विषय मांडले.
महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामीण कुटुंबापर्यंत नळाद्वारे सुरक्षित व नियमित पाणीपुरवठा पोहोचवून ‘हर घर जल’चा संकल्प शाश्वतपणे पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि महाराष्ट्र शासन एकत्रितपणे काम करीत असून, लोकप्रतिनिधींच्या सहभागातून या अभियानाला अधिक गती देण्यात येईल, असा विश्वास राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
जलजीवन मिशनच्या दुसऱ्या टप्प्याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील (C.R.Patil) यांनी अभियानासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद करण्यात आल्याचे सांगितले. या माध्यमातून नवीन पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली असून, केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयातून तसेच आवश्यक तांत्रिक सहाय्य आणि निधीच्या उपलब्धतेतून ग्रामीण भागातील जलसुरक्षेच्या कामांना वेग देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.






