पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अभिनय क्षेत्रात काम करत असताना इतर चित्रपट निर्मात्यांचे चित्रपट पाहणे गरजेचे आहे. शिवाय उत्तम कथा, पटकथा, संवाद असलेल्या कलाकृती कलावंत म्हणून पाहणे गरजेचे आहे. कलाकारांनी माणूस म्हणून कलाकृती आणि भूमिका बजावली पाहिजे. भूमिकेचा किंवा पात्राचा चष्मा लावताना स्पर्धा ही स्वतःशीच करायला हवी, असे प्रतिपादन अभिनेते सिद्धश्वर झाडबुके यांनी केले. युवा संवाद सामाजिक संस्थेच्या वतीने दुसऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय युवा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन आंबेगाव येथील कै. अभिजित कदम विरंगुळा केंद्र येथे करण्यात आले होते.
प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले उपस्थित होते. लघुपट हा चित्रपट निर्मिती क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावतो. मोठ्या कसोटीतून चित्रपट बनवला जातो. मोठमोठे निर्माते, दिग्दर्शक लघुपट बनवत असल्याचे चित्र आपल्याला दिसते आहे. लघुपट निर्मात्यांसाठी नोंदणी करून चित्रपट महामंडळाच्या वतीने सर्वोत्कृष्ट लघुपटाचे चित्रपट होण्यासाठी निर्माते शोधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती राजेभोसले यांनी दिली.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. फुलचंद चाटे यांच्या हस्ते करण्यात आले. युवा लघुपट महोत्सवात एकूण ६३ लघुपट सहभागी झाले होते. त्यापैकी २० नामांकन मिळालेल्या लघुपटांचे प्रदर्शन महोत्सवात करण्यात आले. या महोत्सवात पिरॅमिड लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपट प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. देवा तुला शोधू कुठे या लघुपटास द्वितीय, तर ‘पेपर’ या लघुपटास तृतीय क्रमांक मिळाला. सत्यारंभ लघुपटास उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला.
या वेळी राजीव जगताप, समीर धनकवडे, प्रवीण वनशिव, सागर बोदगिरे, बाळासाहेब धोका, माजी नगरसेवक शंकरराव बेलदरे पाटील, संतोष ताठे, नितीन जांभळे, दिलीप जगताप, भाजपा नेते संदीप बेलदरे, मंगेश जाधव, संभाजी थोरवे, युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनराज गरड, विश्वास सूर्यवंशी आदी उपस्थित होते. आकाश कदम, प्रबुद्ध प्रक्षाळे, गणेश कदम, प्रेम गरड, जयदीप निंबाळकर यांनी संयोजन केले. चैतन्य बनकर यांनी सूत्रसंचालन केले.