Rajpal Yadav : खपवून घेतलं जाणार नाही.! अभिनेता राजपाल यादव यांच्या अडचणी वाढल्या, अटक होण्याची शक्यता; प्रकरण नेमकं काय?
एप्रिल २०१८ मध्ये दंडाधिकारी न्यायालयाने यादव यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.

Rajpal Yadav – दिल्ली उच्च न्यायालयाने चेक बाउन्स प्रकरणात दोषी ठरलेल्या अभिनेता राजपाल यादव यांना ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत संबंधित तुरुंग अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले आहेत.
न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी यादव यांनी न्यायालयाला दिलेल्या आश्वासनांचे वारंवार उल्लंघन केल्याने पुढील सवलत देण्यास नकार दिला. न्यायालयाने नमूद केले की, तक्रारदार मेसर्स मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांना सात प्रकरणांमध्ये प्रत्येकी १.३५ कोटी रुपये देय असून, रजिस्ट्रार जनरलकडे जमा करण्यात आलेली रक्कम तक्रारदाराच्या नावे सोडण्यात यावी.
ऑक्टोबर २०२५ मध्ये ७५ लाख रुपयांचे दोन डिमांड ड्राफ्ट जमा करण्यात आले असले तरी अद्याप ९ कोटी रुपये थकित असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. वारंवार संधी देऊनही याचिकाकर्त्याने आदेशांचे पालन केले नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने शिक्षा पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
अभिनेता राजपाल यादव सध्या मुंबईत व्यावसायिक कामात गुंतले असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितल्याने मर्यादित मुदतवाढ देण्यात आली. एप्रिल २०१८ मध्ये दंडाधिकारी न्यायालयाने यादव यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आव्हान देणाऱ्या पुनर्विचार याचिकांवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हा आदेश दिला.





