मुंबई – आज क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा वाढदिवस. सचिनने वयाची पन्नाशी पूर्ण केलेली असली तरी आजही मैदानावरील त्याच्या अनेक आठवणी डोळ्यासमोर येतात. त्यातीलच एक म्हणजे सचिनने पाकिस्तनच्या अब्दुल कादिर विरोधात वयाच्या सोळाव्या वर्षी केलेली तुफान फटकेबाजी.
1989 मध्ये सचिन तेंडुलकरने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. त्यावेळी 16 वर्षीय सचिनला जागतिक क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवायचा होता. पेशावरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात मैत्रीपूर्ण सामना खेळला जात होता. जिथे पाकिस्तानचा महान लेगस्पिनर अब्दुल कादिरने त्या 16 वर्षाच्या मुलाला उचकवण्याचा प्रयत्न केला होता.त्यानंतर सचिनने जे केले ते आजवर कोणीही विसरू शकलेला नाही.
16 वर्षांचा सचिन तेंडुलकर बॅटिंग करत होता आणि त्याने मुश्ताक अहमदच्या षटकात दोन षटकार ठोकले होते. सचिनचे हे षटकार पाहून अब्दुल कादिर भडकला आणि त्याने थेट युवा सचिनला आव्हान दिले. कादिरने सचिनला म्हणाला, “बच्चे को क्या छक्के मार रहा है, हिम्मत है तो मुझे सिक्स मारके दिखा”
सचिनने धुव्वा उडवला
सचिनने त्यावेळी अब्दुल कादिरसमोर एकही शब्द काढला नाही. पण त्या १६ वर्षांच्या मुलाने दिग्गज फिरकीपटूचे ते आव्हान स्वीकारले होते. पुढच्याच ओव्हरमध्ये अब्दुल कादिर सचिनला बॉलिंग करायला आला तेव्हा मास्टर ब्लास्टरने त्याच्या एका ओव्हरमध्ये एक-दोन नव्हे, तर थेट चार षटकार ठोकले. यावेळी सचिनने सलग तीन षटकार ठोकत सिक्सची हॅट्रिक देखील पूर्ण केली.
https://youtu.be/4QNlqJMPifY
16 वर्षीय सचिनची धमाकेदार फलंदाजी पाहून अब्दुल कादिर देखील त्याचा चाहता झाला. त्यावेळी सचिनची बॅटिंग पाहून कादिरनेही टाळ्या वाजवल्या होत्या आणि तो या भारतीय खेळाडूचा चाहता झाला होता. सचिनच्या कारकिर्दीतील हा तो क्षण होता, ज्याने त्याला जागतिक क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख दिली. या सामन्यात पाकिस्तानी चाहत्यांनी सचिनची त्याच्या वयाची खिल्ली उडवली, पण या सगळ्याच्या पलीकडे एक नवी ओळख निर्माण करण्यासाठी त्या दिवशी 16 वर्षांचा मुलगा मैदानात उतरला आणि त्याने इतिहास घडवला. ज्याची आठवन आजही विश्वभरातील क्रिकेट प्रेमींच्या लक्षात आहे.