पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून मित्राच्या घरी बोलवून एकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यातून पीडित मुलगी नुकतीच प्रसूत झाली असून, तिने एका मुलाला जन्म दिला. यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून, सध्या तो नाशिक मध्यवर्ती कारागृहात एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेत आहे.
हा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत आरोपीच्या घरी व कात्रज येथे मित्राच्या घरात घडला आहे. याबाबत १४ वर्षीय मुलीने भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिासंनी सागर संदीप शर्मा (रा. एसआरए वसाहत, भारती विद्यापीठ, पुणे) याच्यावर बलात्कारासह पोक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी आणि पीडित तरुणीची दोन वर्षांपूर्वी ओळख झाली. आरोपीने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिला स्वत:च्या आणि मित्राच्या घरी वारंवार बोलावून घेत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून पीडित मुलगी गरोदर राहिली. तिने २७ मार्च रोजी संध्याकाळी एका बाळाला जन्म दिला. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन सागर शर्मा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भाबड करत आहेत.
आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार
आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर डिसेंबर २०२३ मध्ये एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करून एक वर्षासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. सागर शर्माच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल असून, त्याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देत नव्हते.