Abhijit Bichukale : “अभिजीत बिचुकलेंना नीलम गोऱ्हेंच्या जागी विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी द्या”; थेट एकनाथ शिंदेंकडे पत्राद्वारे मागणी
Abhijit Bichukale :

Abhijit Bichukale : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 12 मे रोजी मतदान पार पडणार आहे. यासाठी आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेकांनी आपल्याला संधी मिळावी, यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. यातच आता शिवसेनेकडून अभिजीत बिचुकले यांना विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
‘नीलम गोऱ्हे यांच्या जागी बिचुकले यांना संधी द्या’ अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणीचे थेट पत्रच ई-मेलद्वारे पाठवले आहे. स्वत: बिचुकले यांनी कोणतीही मागणी न करता तृप्ती देसाईंनी हे मागणी पत्र पाठवल्याने चर्चांना उधाण आले आहे.
तृप्ती देसाईंनी पत्रात नेमकं काय लिहिले?
नीलम गोऱ्हे यांना अनेकदा संधी मिळूनही पक्ष बांधणीत काम दिसत नसल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केला. त्यामुळे नव्या चेहऱ्याला संधी देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
तृप्ती देसाई यांनी पत्रात लिहिले की, “सध्या विधान परिषदेवर आपल्या पक्षाकडून पुन्हा एकदा डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. नीलमताई अनेक वर्षे विधान परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मात्र त्यांनी पक्ष व संघटना वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले दिसून येत नाहीत. अनेक महिलांना नेतृत्वाची संधी मिळू शकत असताना त्यांनी स्वतःच अनेक पदे भूषवली आहे.
पुणे परिसरात ज्या भागात त्या वास्तव्यास आहेत, तिथेही पक्षाचा साधा नगरसेवक निवडून आणण्यात त्यांना यश आलेले नाही. स्वतः कधीही लोकांमधून मतदान घेऊन त्या निवडून आलेल्याही नाहीत.
तसेच त्यांचे वय आता 70 वर्षांपेक्षा अधिक झाले आहे. त्यामुळे संघटना विस्तारासाठी नवीन आणि प्रभावी नेतृत्वाची गरज आहे.” असे तृप्ती देसाई यांनी पत्रात म्हटले आहे. काम न करणाऱ्या व्यक्तीलाच आपण जर विधान परिषद देणार असाल तर मग महाराष्ट्रातील लोकप्रिय व्यक्तिमत्व अभिजीत बिचुकले यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी.
बिचुकले हे विधान परिषदेच्या माध्यमातून कलाकारांसाठी आवाज उठवू शकतात. तसेच इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर ते थेट भूमिका घेऊन पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडू शकतील,” असे देसाई यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, अभिजित बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणुका अपक्ष म्हणून लढल्या आहेत, मात्र त्यांना एकाही निवडणुकीत विजय मिळवता आलेला नाही. तसेच ते त्यांच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. ते बिग बॉस या शोमध्ये देखील पाहायला मिळाले होते.
हेही वाचा:






