Eknath Shinde : विद्यार्थ्यांच्या भावनांना मोदींचे प्राधान्य; एकनाथ शिंदेनी मानले आभार
विद्यार्थ्यांच्या भावनांना आणि देशाच्या भवितव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्राधान्य दिले असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) त्यांचे आभार मानले आहेत. तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्याबद्दल धर्मेंद्र प्रधान यांचेही कौतुक केले.

Eknath Shinde : विद्यार्थ्यांच्या भावनांना आणि देशाच्या भवितव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्राधान्य दिले असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) त्यांचे आभार मानले आहेत. तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्याबद्दल धर्मेंद्र प्रधान यांचेही कौतुक केले.
नीट पेपरफुटी ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, मात्र या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून केंद्र सरकारने योग्य पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात लोकसभेत नवीन कठोर विधेयक आणणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या गुन्ह्यातून कोणाचीही सुटका होणार नाही. पेपरफुटीवर करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल, असा विश्वास शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांचे हे आंदोलन पूर्णपणे अराजकीय होते, मात्र काही राजकीय लोकांनी त्यात स्वतःच्या पोळ्या भाजून घेतल्या.
काही लोक थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे आंदोलन करत होते, याचा अर्थ पंतप्रधानांच्या घरी घातपात घडवण्याचाच त्यांचा हेतू होता. राहुल गांधी इतरांना इकडे या, इकडे या म्हणून चिथावणी देत होते.
आंदोलन जंतर-मंतरवर सुरू असताना पंतप्रधानांच्या निवासस्थानी का बोलावले जात होते? देशात अराजकता पसरवणे हाच विरोधी पक्षनेत्याचा मुख्य हेतू होता आणि मी या प्रकाराचा तीव्र निषेध करतो, अशी टीका शिंदे (Eknath Shinde) यांनी केली.
तसेच, ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने नाकारले आहे, ते दिल्लीत जाऊन विद्यार्थ्यांना भडकावण्याचे काम करत होते. आता विद्यार्थ्यांनी स्वतःहून आपले आंदोलन यशस्वीपणे मागे घेतल्यानंतर या नेत्यांची मोठी निराशा झाली आहे, असा टोलाही ठाकरेसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे थेट नाव न घेता लगावला.






