Neelam Gorhe: “नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा!” छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात डॉ. नीलम गोऱ्हेंचे आवाहन
Neelam Gorhe: वर्ये येथे विठ्ठल मंगल कार्यालयात महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; सर्वसामान्य नागरिकांना एकाच छताखाली योजनांचा लाभ

Neelam Gorhe – सर्वसामान्य नागरिकांना विविध योजनांचा लाभ एका छताखाली मिळावा व शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारायला लागू नयेत म्हणून आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. नागरिकांनी या स्टॉलला भेट देऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री कै. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून सातारा विधानसभा मतदारसंघांतर्गत वर्ये येथील विठ्ठल मंगल कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलतहोते. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, अप्पर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार, सातारा पंचायत समितीचे सभापती महेश गाडे,
मेढ्याच्या नगराध्यक्ष रूपाली वारागडे, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार समीर यादव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचे राज्य या संकल्पनेनुसार शासन थेट जनतेच्या दारात पोहोचत आहे. सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कामांसाठी कार्यालयांचे फेरे मारावे लागू नयेत, ही शिबिराची मुख्य भावना आहे.
सातारा मतदारसंघातील प्रत्येक घटकाला आणि ग्रामीण भागातील शेवटच्या नागरिकाला या शिबिराचा थेट लाभ मिळावा, हा शिबिराचा उद्देश आहे. महिला, शेतकरी आणि युवकांसाठीच्या विविध योजनांचे दाखले एकाच ठिकाणी मिळणे कौतुकास्पद आहे. महसूल विभागाच्या या पुढाकारामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार असून प्रशासनाने अत्यंत संवेदनशीलतेने नागरिकांचे प्रश्न तात्काळ निकाली काढावेत.’’





