मंचर, (प्रतिनिधी) – निघोटवाडी ता. आंबेगाव ग्रामपंचायतीमार्फत उभारण्यात आलेली गॅस शवदाहिनी १ वर्षापासून वापराविना धुळखात पडून आहे. गॅस शवदाहिनीसाठी बसवलेले काही साहित्य चोरीला गेलेले आहे. देखभालीविना शववाहिनी उभारलेल्या भागातील पाण्ययाचे नळ व इतर साहित्य चोरी गेले आहे. परिणामी मोफत अंत्यसंस्कार करण्याच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला आहे.
मंचर -निघोटवाडी -शेवाळवाडी येथील ग्रामस्थासाठी तपनेश्वर स्मशानभूमी मध्ये गॅस शवदाहिनीसाठी सन 2021 व 2022 रोजी टेंडर मंजूर झालेले होते. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळातून ७५ लक्ष रुपये आणि जिल्हा परिषद सदस्य अरुणा थोरात यांनी १५ लक्ष रुपयाचा निधी मंजूर करून आणला होता. हे काम पूर्ण होऊन एक वर्ष झालेले असून यासाठी ९० लक्ष रुपयाचा निधी खर्च झालेला आहे.
या गॅस शवदाहिनीची देखभाल कोणी करायची, यासाठी मंचर नगरपंचायत आणि निघोटवाडी ग्रामपंचायत यांच्यातील समन्वयाअभावी ही गॅस शवदाहिनी चालू झाली नसल्याची चर्चा आहे. त्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या टॉयलेटसाठी बसवलेल्या भांड्याची बेसिनची व दरवाज्याची तोडफोड करण्यात आलेली आहे. गॅस शवदाहिनीसाठी बसवलेले नोझल व नळ चोरीला गेल्याचे मंचर नळ पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष वसंतराव बाणखेले यांनी सांगितले. त्या ठिकाणी दारुडे, गांजा पिणारे, भटकी कुत्री आणि भिकारी यांचा वावर सातत्याने दिसतो.
गॅस शवदाहिनी लवकरात लवकर चालू करावी. त्या ठिकाणी प्रशिक्षित कामगार नेमून मृत्यूच्या नोंदीचे कार्यालय उघडावे. मंचर नगरपंचायतीने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर मोफत अंत्यसंस्कार करावे, अशी मागणी मंचर नळ पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष वसंतराव बाणखेले यांनी केली आहे .
कोट :
निघोटवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गॅस शवदाहिनी उभारण्यात आलेली आहे. तिचा मालकी हक्क जिल्हा परिषदकडे असल्याने त्यांना पत्र देऊन ग्रामसभेच्या ठरावाची प्रत पाठवली जाणार आहे. त्यानंतर त्याच्या आदेशानुसार नगरपंचायतीकडे देण्यासाठी कार्यवाही केली जाणार आहे. -नवनाथ निघोट, सरपंच, निघोटवाडी ग्रामपंचायत.
…………….
कोट :
मंचर नगरपंचायतीकडे गॅस शवदाहिनी हस्तांतर झाल्यानंतर लगेच कार्यवाही केली जाईल.
-गोविंद जाधव, मुख्याधिकारी मंचर नगरपंचायत.