वॉशिंग्टन : माया संस्कृतीतील एका प्राचीन विशाल नगराचा शोध लागला आहे. मेक्सिकोच्या जंगलांमध्ये अनेक शतकांपूर्वी हे शहर गायब झालं होतं. घनदाट वृक्षराजीत, जंगलाखाली ते दडून गेलं होतं. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या टीमनं एकूण तीन ठिकाणांचा शोध लावला आहे.हे नवं संशोधन अँटिक्विटी या मासिकात प्रकाशित झालं आहे.
या सर्वांचं एकत्रित क्षेत्रफळ स्कॉटलंडची राजधानी असलेल्या एडिनबर्गएवढं आहे.मेक्सिकोच्या आग्नेय भागातील कॅम्पेचे राज्यात पुरातत्व शास्त्रज्ञांना पिरॅमिड, खेळाची मैदानं, अॅम्फी थिएटर आणि जिल्ह्यांना जोडणारे मार्ग सापडले आहेत.पुरातत्वशास्त्रज्ञांनी लायडार तंत्रज्ञानाचा वापर करून जंगलाखाली दडलेल्या शहराचा हा सर्व परिसर समोर आणला आहे. लायडार हा एक प्रकारचा लेझर सर्व्हे असतो.
त्यात झाडी, जंगलं, वृक्षराजीखाली गाडल्या गेलेल्या वास्तू, इमारती, बांधकामं यांचा छडा लावला जातो. या परिसराला त्यांनी व्हॅलेरिआना असं नाव दिलं आहे.
पुरातत्वशास्त्रज्ञाना वाटतं की कलाकमूलनंतर इतक्या घनतेचं हे दुसऱ्या क्रमांकाचं पुरातन स्थळ आहे.कालाकमूल हे प्राचीन लॅटिन अमेरिकेतील माया संस्कृतीचं सर्वात मोठं ठिकाण असल्याचं मानलं जातं.
या ठिकाणाचा शोध अपघातानंच लागला आहे. एक पुरातत्वशास्त्रज्ञ इंटरनेटवर काही माहिती शोधत असताना या ठिकाणाचा उलगडा झाला आहे.
अमेरिकेतील ट्युलेन विद्यापीठात पीएचडीचे विद्यार्थी ल्युक ऑल्ड-थॉमस गुगल सर्चच्या साधारण 16 व्या पानावर त्यांना एका मेक्सिकन संस्थेनं पर्यावरणीय देखरेखीसाठी केलेला लेझर सर्व्हे सापडला ऑल्ड-थॉमस यांनी पाहिलं की तो एक लायडार सर्व्हे होता. लायडार सर्व्हे म्हणजे एक रिमोट सेन्सिंग टेक्निक असते ज्यात विमानातून हजारो लेझर पल्सेस टाकले जातात.मग जमिनीवर पडलेल्या या लेझर किरण किंवा सिग्नलला परत येण्यासाठी लागणाऱ्या कालावधीचं मोजमाप करून त्या आधारे खाली असलेल्या वास्तू, इमारती, बांधकाम यांचे नकाशे बनवले जातात.
ऑल्ड-थॉमस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्राचीन शहराला व्हॅलेरिआना असं नाव दिलं. तिथे जवळच असलेल्या एका सरोवराच्या नावावरून हे नाव देण्यात आलं.ही संस्कृती नष्ट का झाली, हे शहर का नष्ट झालं आणि तिथले निवासी हे शहर सोडून का गेले, याबद्दल आम्हाला निश्चितपणे सांगता येणार नाही. मात्र पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणतात की यामागे हवामान बदल हे प्रमुख कारण होतं.
या संशोधनातून दिसतं की इसवीसन 800 नंतर माया संस्कृतीचा ऱ्हास झाला, ती नष्ट झाली. त्यामागचं एक कारण म्हणजे माया लोकांच्या वस्त्या खूपच दाटीवाटीच्या होत्या आणि त्यामुळे हवामान बदलांमुळे निर्माण झालेल्या समस्यांना ते तोंड देऊ शकले नाहीत.