बुलडाणा – विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातून एक अनोखी बातमी समोर आली आहे. येथील साडेतीन वर्षाच्या मुलाच्या घशात अडकलेला सेल बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. विशेष म्हणजे, डॉक्टरांनी घशात अडकलेला सेल काढण्यासाठी अनेस्थेशियाची देखील मदत घेतली नाही. डॉक्टरांनी केलेल्या या कमालीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
येथील एका मुलाने सेल गिळला होता. त्यानंतर मुलाची प्रकृती झपाट्याने खालावू लागली. चिमुरड्याचा त्रास पाहून कुटुंबीयांनी मुलाला तातडीने लहान मुलांच्या रुग्णालयात धाव घेतली. तेथे डॉक्टर सचिन सांगळे यांनी एक्स रे काढला. ज्यात मुलाच्या अन्ननलिकेत सेल अडकल्याचं दिसून आलं.
मुलाची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला अकोल्याला हलविण्याचा सल्ला दिला. मात्र मुलाच्या कुटुंबीयांनी तुम्हीच काही तरी करा डॉक्टर अशी विनंती केली. या विनंतीनंतर डॉक्टरांनी सेल काढण्यासाठी पुढाकार घेतला.
डॉक्टरांनी फोलिस कॅथेटरचे टोक मुलाच्या तोंडात टाकलं. तर दुसऱ्या टोकाला सलाईन लावण्यात आलं. कॅथेटरच्या पुढच्या टोकाला एक फुगा तयार झाला. जेव्हा कॅथेटर बाहेर काढण्यात आला त्या फुग्यासोबत सेल देखील बाहेर आला.
दरम्यान सेलच्या एका बाजुने लाल रंग बाहेर येत होता. यावर डॉक्टर म्हणाले की, सेलमध्ये लिथियम असते. हे लिथियम घशात वितळण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे मुलाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. मात्र वेळीच सेल बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. जिल्ह्यात डॉक्टरांनी केलेल्या कमालीचं कौतुक करण्यात येत आहे.