नगर – शहरात पालिकेच्या कृत्रिम हौदात विसर्जित केलेल्या गणेश मूर्तींची हेळसांड पाहायला मिळाली. शहर आणि उपनगरातील पीओपीच्या गणेशमूर्ती कृत्रिम हौदात पूर्णपणे विसर्जित झाल्या नाही, महापालिकेने उपाययोजना करणे गरजेचे होते. हा विषय धार्मिक आणि भावनिक दृष्ट्या महत्वाचा असल्याने महापालिका प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे.
मातीच्या गणेशमूर्तीच्या तुलनेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती खरेदीकडे कल वाढला आहे. पीओपीच्या गणेशमूर्ती पाण्यात विरघळत नाहीत, शहरातील मिस्कीन मळा, माळीवाडा येथे पालिकेने १४ कृत्रिम हौद बनवले होते. परंतु हौदातील पाणी संपल्याने विसर्जित न झाल्याने वर आलेल्या गणेश मूर्तींची हेळसांड झाल्याचे निदर्शनास आले. आपल्या लाडक्या बाप्पाची विसर्जनानंतरही अशी अवस्था होणार असेल, तर पुढील वर्षी बाप्पाचे विसर्जन महापालिकेच्या हौदात करायचे की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
तसेच पालिकेच्यावतीने निर्माल्याची कोणतेही व्यवस्था नसल्याने ते सर्वत्र पसरल्याने पावसामुळे दुर्गंधी पसरली आहे. पालिकेने १० दिवस ओरडून दिलेला संदेश पायदळी तुडवला महापालिकेच्या हौदात मूर्ती विसर्जित करण्याची भूमिका कितपत खरी होती की तो फक्त एक दिखावा होता, असा प्रश्न उपस्थित होत आहे.