उंब्रज – वराडे (ता. कराड) येथील डोंगरावरील दरड कोसळू लागली आहे. डोंगरावरून दगड व मुरूम मोठ्या प्रमाणावर निसटून मंदिराच्या पटांगणावर येऊन पडल्याचे शनिवारी सकाळी निदर्शनास आले. गेल्या तीन- चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने या डोंगरावरील वरचा भाग कोसळला असून दगड व मुरूम खाली ढासळू लागल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
याबाबतची माहिती अशी की, वराडे गावच्या हद्दीत खरजुली देवीचे मंदीर असून या मंदिराला लागून डोंगर आहे. गेल्या तीन- चार दिवसांपासून या डोंगरावरील वरचा भाग खचू लागला आहे. यापुर्वीही अनेकवेळा पावसाळ्यात डोंगरावरील मुरुम व दगड निसटून खाली पडले आहेत. मात्र, शनिवार, दि. 22 रोजी सकाळी मोठ्या प्रमाणावर डोंगराचा काही भाग खाली कोसळला. त्यामुळे खरजुली देवी मंदीर परिसरात दगड व मुरमाचा खच निर्माण झाला आहे.
याबाबतची माहिती वराडे गावचे सरपंच इंगळे यांना कळल्यानंतर त्यांनी सकाळी डोंगरावर जावून प्रत्यक्ष पाहणी केली. सदरचा डोंगर वनविभागाच्या हद्दीत असल्याने त्यांना याबाबतची माहिती कळवली. त्यानंतर वनपाल सागर कुंभार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. डोंगराचा काही भाग पावसामुळे खाली पडल्याचे लक्षात आले. दरम्यान, सदरच्या डोंगराचा निसटलेला काही भाग हा खरजुली देवीच्या मंदिर परिसरात येऊन कोसळला आहे.
या परिसरात सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांनी, तसेच गुरे चारण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वनविभागाच्यावतीने या भागात सुरक्षेसाठी रेलिंग लावण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी. जनावरे चरण्यासाठी या परिसरात आणू नयेत, असे आवाहन वनपाल सागर कुंभार यांनी केले आहे.