चरेगाव -कळंत्रेवाडील भटक्या वळू बैलावर समाजकंटकांनी ऍसिड हल्ला केला होता. काहींकडून त्याला मारहाणही करण्यात आली होती. दरम्यान, या वळूला लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भावही झाला होता. या सर्व हाल आपेष्ठा सहन करणाऱ्या जखमी वळूचे दैनिक प्रभातने वृत्त प्रसिद्ध केल्यांनतर सातारा येथील जकातवाडीच्या व्ही केअर फाउंडेशनने सदर वळूच्या उपचार व संगोपनाची जबाबदारी स्वीकारत नुकतेच त्याचे पुनर्वसनही केले आहे.
कळंत्रेवाडील, ता. कराड परिसरात जवळपास सात-आठ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या वळू बैलाकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले जात असल्याने त्याला परिसरातून हुसकावून लावण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केला. दरम्यान, एकदा तर अक्षरशः वळूला ट्रॅक्टरच्या सहाय्याने उंब्रजपर्यंत ओढत नेण्याच्या अमानवीय प्रकारामुळे कहर केला होता. पोटाची आग भागवण्यासाठी शेतातील दोन-चार देठ मोडण्याबरोबरच निसर्ग नियमानुसार गोवंशीय मादी पशूंकडे तो वळू आकृष्ट होत असे. त्यातूनच पुढे दोन गाई मृत्युमुखी पडल्याचे नागरिक सांगतात.
परंतु, असे असले तरी, प्राणीमित्र संघटना, गोशाळा अथवा भटक्या पशूंसाठी कार्यरत असणाऱ्या संस्था आदींशी संपर्क साधून पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शनाखाली रीतसर मार्गाने त्याचे सुरक्षितपणे पुनर्वसन करून त्यांचे पुढील आयुष्य सुखकर करणे गरजेचे होते. मात्र, त्याच्यावर अमानवीय ऍसिड हल्ला, मारहाण व ट्रॅक्टरला बांधून ओढत नेण्याचा प्रकार झाला. तसेच लंपी चर्मरोगाच्या प्रादुर्भावामुलेची त्याचे हाल झाले.
या सर्व प्रकाराबाबत दैनिक प्रभातने सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यांनतर गोरक्षक विठ्ठल हजारे, अविनाश थोरात, स्वप्नील खरे यांच्या मदतीने जखमी वळूची मरणयातनांमधून मुक्ती करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यांनतर उंब्रजचे पशुधन विकास अधिकारी के. एस. डिसले यांनी वळूवर प्राथमिक उपचार केले. तसेच त्याला पुनर्वसित करण्यासंदर्भातही मार्गदर्शन केले.
दरम्यान, सातारा (जकातवाडी) येथील व्ही केअर फौंडेशनच्या अध्यक्षा जास्मिन अफगान यांनी प्रभातच्या प्रतिनिधीशी संपर्क साधत जखमी वळूच्या पुढील उपचारांची तवसेच संगोपनाचीही तयारी दर्शवली. त्यांनतर गोरक्षक, पशुधन विकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून शुक्रवार, दि. 21 जुलै रोजी व्ही केअर फाउंडेशनच्या रेस्क्यू टीमला वळू ताब्यात घेण्यासाठी पाचारण केले. कळंत्रेवाडी व नाणेगाव ग्रामस्थांकडून रेस्क्यू ऑपरेशन करत वळूला ताब्यात घेत व्ही केअर फौंडेशनकडे सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आले.
व्ही केअर फौंडेशनच्या आवारात “ट्रॅक्टरला बांधून ओढत नव्हे; तर सुरक्षितरीत्या पुनर्वसित करून त्याचे पुढील आयुष्य सुखकर, सुरक्षित करण्यासाठी साताऱ्याकडे रवाना केले. यासाठी प्रयत्न केलेल्या व्ही केअर फौंडेशनच्या अध्यक्षा जास्मिन अफगान, पशुवैद्यकीय अधिकारी, पत्रकार, प्राणीमित्र, गोरक्षक या सर्वांचे ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करण्यात आले.