Sayaji Shinde Sahyadri Devrai | सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकारातून आणि वनविभागाच्या सहकार्याने बीड जिल्ह्यातील पालवन शिवारात उभारण्यात आलेल्या सह्याद्री देवराई प्रकल्पाला भीषण आग लागली आहे. या आगीत शेकडो झाडे व रोपे जळून खाक झाली आहे. या आगीत झाडाझुडपांसह जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सयाजी शिंदेंनी राज्यातील पर्यावरण रक्षण आणि वृक्षसंवर्धनासाठी ‘सह्याद्री देवराई’ नावाची संस्था स्थापन केली आहे. या उपक्रमांतर्गत त्यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी देवराया उभारल्या आहेत. बीड जिल्ह्यातील पालवन या ठिकाणची देवराईचाही समावेश आहे. मात्र, बुधवारी (ता.24) सयाजी शिंदेंनी उभारलेल्या देवराईतील झाडांना भीषण आग लागली. सह्याद्री देवराई प्रकल्प हा पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. या प्रकल्पांतर्गत स्थानिक वृक्षलागवड, देवराई संवर्धन व जैवविविधतेचे संरक्षण करण्यात येत होते. सयाजी शिंदे यांनी या ओसाड डोंगराला हिरवागार करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावलं होतं. मात्र या आगीमुळे अनेक वर्षांच्या मेहनतीला फटका बसला आहे. आगीत लहान-मोठी झाडे, रोपे तसेच वन्यजीवांचे अधिवास बाधित झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी नाशिक येथे होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळाव्यातील साधूग्रामसाठी तपोवनात हजारो वृक्षतोड करण्यात येणार होती. या वृक्षतोडीविरोधात मोठं आंदोलन छेडलं होतं. या आंदोलनात सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह अनेक कलाकार, मराठी कलाकार यांच्यासह पर्यावरणप्रेमी संस्था सहभागी झाल्या होत्या. पण न्यायालयानं या वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे. मात्र त्यानंतर घडलेल्या या घटनेने अनेकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, देवराईतील झाडांना आग लागलीच कशी? असा संतप्त सवाल पर्यावरणप्रेमी संस्थांकडूनही केला जात आहे. ही आग नैसर्गिक कारणाने लागली की कुणी जाणीवपूर्वक लावली, याचा तपास आता वनविभाग करत आहे. दरम्यान, बीड येथील पालवन येथील सह्याद्री देवराईला याआधी फेब्रुवारी 2022 रोजी भीषण आग लागली होती. या आगीच्या दुर्घटनेत जवळपास 2 ते 6 एकरमधील हजारो झाडे जळून खाक झाली होते. Sayaji Shinde Sahyadri Devrai | हेही वाचा: PMC News: अखेर महापालिकेला महसूलवाढीची आठवण; पाच वर्षांनी समितीची पहिली बैठक