Sayaji Shinde : चाहतीच बनली जीवनसाथी! अशी आहे अभिनेते सयाजी शिंदे यांची फिल्मी ‘लव्हस्टोरी’
Sayaji Shinde : सयाजी शिंदे यांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही मागे टाकणारी आहे. त्यांची चाहती असलेली अलका यांच्याशीच त्यांनी विवाह केला.

Sayaji Shinde : मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम अशा विविध भाषांतील सिनेमांमध्ये दमदार अभिनयाची छाप उमटवणारे अभिनेते सयाजी शिंदे हे खऱ्या अर्थाने पॅन इंडिया स्टार आहेत. अभिनयासोबतच सामाजिक कार्य आणि पर्यावरण संवर्धनासाठीही ते ओळखले जातात. मात्र, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, विशेषतः त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल फारच कमी जणांना माहिती आहे.
सयाजी शिंदे यांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही मागे टाकणारी आहे. त्यांची चाहती असलेली अलका यांच्याशीच त्यांनी विवाह केला. दोघांची लव्हस्टोरी नेमकी कशी सुरू झाली? याविषयी जाणून घेऊयात….
रुग्णालयात झाली पहिली भेट
सयाची शिंदे यांच्या पत्नीचे नाव अलका शिंदे असून, दोघांची पहिली भेट १९९० च्या दशकात एका रुग्णालयात झाली होती. त्या काळात सयाजी शिंदे कावीळच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. योगायोगाने अलका यांच्या मेहुण्यांवरही त्याच रुग्णालयात उपचार सुरू होते. या काळात सिनेमांपेक्षा सयाजी शिंदे नाटकांमध्ये दिसत होते. त्यांची अनेक नाटक रंगभूमीवर गाजली.
आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्याची संधी मिळाल्याचे कळताच अलका यांनी सयाजी यांची भेट घेतली. याआधी अलका यांनी सयाजी शिंदे यांची ‘झुलवा’ आणि ‘आमच्या या घरात’ ही नाटके पाहिली होती. त्यांच्या अभिनयाने त्या प्रभावित झाल्या होत्या. रुग्णालयातील त्या पहिल्या भेटीत दोघांमध्ये नाटक, साहित्य, वाचन आणि विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा रंगल्या.
संवादादरम्यान सयाजी यांनी अलका यांना, “तू वाचन करतेस का?” असा प्रश्न विचारला. अलका यांनी होकार दिल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे वाचण्यासाठी एखादे पुस्तक आणून देण्याची विनंती केली. आपल्या आवडत्या अभिनेत्याने केलेल्या या विनंतीमुळे अलका भारावून गेल्या आणि त्यांनी त्यांच्यासाठी पुस्तक आणून दिले.
२००२ मध्ये विवाह
या भेटीनंतर जवळपास दोन महिन्यांनी सयाजी शिंदे मुंबईतील बँडस्टँड परिसरात एका सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. त्यांनी अलका यांना फोन करून पुस्तक परत देण्यासाठी भेटण्याचे ठरवले. त्या भेटीनंतर दोघांचा संवाद वाढत गेला आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. जवळपास दोन वर्षे एकमेकांना समजून घेतल्यानंतर दोघांनी कुटुंबीयांच्या संमतीने २००२ मध्ये विवाह केला. आज सयाजी आणि अलका शिंदे यांचा सुखी संसार असून त्यांना सिद्धार्थ नावाचा मुलगा आहे.परदेशात तो शिक्षण घेत आहे.
अलका शिंदे साधं आयुष्य पसंत करतात
अलका शिंदे या नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहण्यापेक्षा साधं आयुष्य पसंत करतात. दुसरीकडे, सयाजी शिंदे आजही विविध भाषांतील सिनेमात आणि नाटकांमधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. त्यांचा सोशल मीडियावर मोठे फॅन फॅलोविंग असून यू ट्यूब, इंन्स्टाग्रावरुन व्हिडीओ आणि रिल शेअर करत चाहत्यांसोबत कनेक्ट राहणे पसंत करतात.
Baramati News : पालखी सोहळ्यानंतर अवघ्या एका तासात शहर चकाचक…





