Sayaji Shinde : “झाडे तोडायला आले तर त्यांना हाकलवून लावा”; अभिनेते सयाजी शिंदे संतापले
टोरेंटसारखा एकही प्रकल्प आम्हाला नको. त्यासाठी कोणतीही झाडे तोडायला नको. जी जुनी पर्यावरणाची व्यवस्था आहे त्याला हात न लावता हे प्रकल्प करा.

Sayaji Shinde – रायगडच्या कर्जतमध्ये प्रस्तावित टोरेंट कंपनीच्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी पर्यावरणवादी कार्यकर्ते एकवटले आहेत. या प्रकल्पासाठी एकही झाड तोडू दिले जाणार नाही.
कुणी झाडे तोडायला आले तर तो कोरोनापेक्षा भयंकर रोग आहे असे समजा आणि हातात ताट-वाट्या घेऊन वाजवत त्यांना हाकलवून लावा, असे आवाहन अभिनेते आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनी केले आहे.
शिंदे म्हणाले, सह्याद्री हे जगातले एक मोठे आश्चर्य आहे. अशा पद्धतीने पशु-पक्षांच्या घरावर बॉम्ब टाकून, त्यांना उद्ध्वस्त करून आपण काय साध्य करत आहोत.
कंपनीच्या प्रकल्पासाठी यापुढे एकही झाड तोडू देणार नाही. याठिकाणी आतापर्यंत हजारो वृक्ष तोडण्यात आली आहेत. या प्रकल्पाला आता पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी विरोध करत आक्रमक भूमिका घेतली आहे.
विकासकामांच्या नावावर जमिनी घेतल्या तर तिथल्या पुढच्या पिढ्या भिकेला लागतील. यापुढे एकही झाड तोडू देऊ नका नाहीतर विकास संपलेला आहे असे समजा.
यामध्ये एकही झाड न तोडता हा प्रकल्प करावा, आमचा त्याला विरोध नाही. जगात फक्त 18 टक्के जंगले शिल्लक आहेत. ते आपल्याला 33 टक्के करणे आवश्यक आहे. पण ते वाढवण्याऐवजी ही झाडे तोडली जात आहेत.
शेकरू हा राज्यप्राणी हा भिमाशंकर अभयारण्यामध्ये आहे. पण आपण फक्त भिमाशंकर अभयारण्यामध्येच राहायचे, बाजूच्या कर्जतमध्ये जायचे नाही ही सीमा त्याला कशी समजणार? शंभर-दीडशे वर्षांपूर्वीची झाडे तोडून आपण काय करतोय? असा प्रश्न शिंदे यांनी केला.
यापुढे टोरेंटसारखा एकही प्रकल्प आम्हाला नको. त्यासाठी कोणतीही झाडे तोडायला नको. जी जुनी पर्यावरणाची व्यवस्था आहे त्याला हात न लावता हे प्रकल्प करा. पर्यावरण नष्ट करण्यासाठी तुम्हाला निवडून दिले आहे का? आहे ती मोठी झाडे तोडू नका, हीच आमची मागणी आहे, असे सयाजी शिंदे म्हणाले.






