Sayaji Shinde : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सयाजी शिंदे सुनेत्रा वाहिनींसह शरद पवारांना भेटले; नेमकी काय चर्चा झाली?
Sayaji Shinde : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अभिनेते सयाजी शिंदे यांनी शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेतली.

Sayaji Shinde : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या दुःखद घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेससह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून, त्याचवेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर अभिनेते सयाजी शिंदे यांनी महाराष्ट्राच्या भविष्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र यावे, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. आपण आज सुनेत्रा पवार यांची भेट घेतली तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशीही संवाद साधल्याची माहिती सयाजी शिंदे यांनी दिली.
काय म्हणाले सयाजी शिंदे?
सयाजी शिंदे म्हणाले, “अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्र निःशब्द झाला आहे. काही सुचायला देखील वेळ लागत आहे. आज सुनेत्रा वहिनींची भेट घेतली, काय बोलावं हेच कळत नव्हतं. त्यानंतर मोठ्या साहेबांचीही भेट घेतली. मला मनापासून असं वाटतं की महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात. निवडणुकीच्या काळातही एकत्र येण्याची चर्चा होती, आता केवळ औपचारिकता बाकी होती. अशा वेळी ही दुर्दैवी घटना घडणं महाराष्ट्रासाठी फार वाईट आहे.”
ते पुढे म्हणाले की, “दादांचा निर्णयक्षमता असलेला उमदा स्वभाव पुन्हा महाराष्ट्रात यावा, हे त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं. ताकद वाढवायची असेल तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं गरजेचं आहे. सध्या झालेल्या दुःखावर कोणीही नीट बोलू शकत नाही.”
दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी येत्या 12 तारखेला पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचा खुलासा करणार असल्याचं संकेत दिले आहेत. तर अजित पवार गटातील सुनील शेळके यांनी पवार कुटुंब आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये विलीनीकरणासंदर्भात चर्चा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.





