राहुरी (प्रतिनिधी): ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतात रोटा मारत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन शेतकरी ट्रॅक्टरखाली दबून जागेवर मयत झाल्याची घटना दरडगाव थडी येथे आज सकाळी घडली.
संजय सिताराम जाधव (वय ४३) हे दरडगाव थडी येथे राहत आहेत. तेथील मुळा नदीकाठी त्यांची शेतजमीन असून, जाधव हे आज सकाळी १०.३० वाजे दरम्यान त्यांच्या शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटा मारत होते. यावेळी ट्रॅक्टरचे चाक बांधावर जाऊन ट्रॅक्टर पलटी झाला.
जाधव ट्रॅक्टर खाली दबले गेले. परिसरातील मच्छिंद्र जाधव, बाबुराव दोंदे, बापूसाहेब रोकडे, संदीप जाधव, मधुकर जाधव यांच्यासह अनेक तरुणांनी तत्काळ मदतकार्य करूरुन जेसीबी बोलावून घेतला.
जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टर उचलून जाधव या शेतकऱ्याला बाहेर काढले. त्यांना ताबडतोब राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आंबरे यांनी संजय जाधव यांना तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले. जाधव यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, बहिण, भाऊ असा परिवार आहे. राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.