नवी दिल्ली – करोना आणि एखाद्या विशिष्ट व्हिटॅमिनच्या संदर्भात गेल्या काही महिन्यांत अनेक संशोधनपर लेख प्रसिध्द झाले आहेत. त्यानुसार व्हिटॅमिन डी आणि करोनाचे कनेक्शन अधोरेखित झाले आहे. याचा अर्थ करोनाच्या विरोधात हे व्हिटॅमिन उपयुक्त असल्याचे दावे करण्यात आले आहे.
मात्र त्याचवेळी याबाबत आणखी पुरावे आवश्यक असल्याचा खबरदारीचा इशाराही देण्यात आला आहे.
गेल्याच आठवड्यात एक अहवाल प्रसिध्द झाला आहे. त्यात 235 रूग्णांचा अभ्यास करण्यात आला. ज्यांच्या शरिरात व्हिटॅमिन डीची कमतरता होती, त्यांना अन्य रूग्णांच्या तुलनेत धोका अधिक असल्याचे आढळून आल्याचे नमूद करण्यात आले आहे. बेशुध्द होणे, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे प्रसंगी मृत्यूचाही धोका आणि विविध गुंतागुंत होण्याचा धोका या रूग्णांना असल्याचा दावा करण्यात आला.
मात्र ज्यांच्या शरिरात व्हिटॅमिन डीचे प्रमाण पुरेसे असते त्यांची प्रतिकार शक्ती वाढल्याचेही निदर्शनास आल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाही असाच अहवाल प्रकाशित झाला होता. त्यातही आताच्या अहवालानुसार हे व्हिटॅमिन आणि करोना यातील कनेक्शन सिध्द झाल्याने संशोधकांचे म्हणणे आहे.
ज्या व्यक्तींच्या शरिरात व्हिटॅमिन डीची कमतरता असते त्यांना ज्यांच्यात कमतरता नसते त्यांच्यापेक्षा करोनाची लागण होण्याचा धोका अधिक असतो असे तेव्हा त्या अहवालात सांगण्यात आले होते. टक्केवारीच्या भाषेत हे प्रमाण 1.77 टक्के अर्थात लागण होण्याचे प्रमाण इतके अधिक असते असे नमूद करण्यात आले होते.
दरम्यान, हे दोन अहवाल आणि अन्य दोन अहवाल जरी प्रकाशित झाले असले तरी व्हिटॅमिन डीच्या उपयुक्ततेबाबत थेट दावा करता येत नाही. त्याकरता अजुन काही पुराव्यांची गरज असल्याचे कॅनडातील एका महिला संशोधकाने म्हटले आहे. मात्र व्हिटॅमिनची कमतरता असली तरी अन्य आजारांचा धोकाही बळावतो असे त्यांनी नमूद केले. पण तेही पूर्ण सिध्द झाले नसल्याचे त्याचवेळी स्पष्ट केले.