पाटणा – बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्याने येथील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. अशातच आज भाजप व नितीश कुमार यांच्या जनता युनायटेड दरम्यान आगामी निवडणुकांसाठीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
भाजप व जेडीयु बिहार विधानसभा निवडणुक एकत्र लढवत असून जागावाटपामध्ये नितीश कुमारांच्या जनता दल युनायटेडला १२२ तर भाजपच्या वाट्याला १२१ जागा आल्या आहेत. जेडीयु १२२ मधील ७ जागा जितनराम मांझी यांच्या हिंदुस्थानी आवाम मोर्चासाठी सोडणार आहे.
भाजप देखील आपल्या वाट्याला आलेल्या १२१ जागांपैकी काही जागा विकासशील जनता पक्षाला सोडणार आहे, मात्र किती जागा सोडायच्या याबाबतचा निर्णय अद्याप झाला नसल्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
विकासशील जनता पक्ष विरोधकांच्या महागठबंधनमध्ये सामील होता. मात्र महागठबंधनच्या जागावाटपणानंतर नाराज झाल्याने त्यांनी जेडीयु-भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष स्वबळावर लढणार आहे. असं असलं लोजपतर्फे भाजपविरोधात उमेदवार दिला जाणार नसल्याचे पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी स्पष्ट केलं आहे.