पुणे – लष्कर परिसरातील कॅंटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये शनिवारी सकाळी 11:15च्या सुमारास आग लागली. बोर्डाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग तत्काळ आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. प्रथमदर्शनी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची माहिती बोर्ड प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर ब्लॉकमध्ये सकाळी अचानक आग लागली. रुग्णालय प्रशासनाने माहिती दिल्यावर पाण्याचे दोन बंब घटनास्थळी पाठविण्यात आले. आगीची तीव्रता मोठी नसली, तरी इमारतीतून धुराचे लोट येत होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी 20 मिनिटे शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. यासाठी दलाचे तांडेल, आसिफ शेख, अनिल ताजणे, सचिन भगत, शम्मी कसोटे, महेश जगताप, अमेय बोराटे यांनी कामगिरी बजाल्याची माहिती कॅंटोन्मेंट अग्निशमन दलाकडून देण्यात आली.
रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांनी सांगितले की, करोनामुळे एप्रिल महिन्यापासून रुग्णालयातील शस्रक्रीया विभाग बंद आहे. मात्र, काही कर्मचारी याठिकाणी कार्यरत होते. त्यांना आग लागल्याचे लक्षात आले, त्यांनी ही माहिती दिल्यामुळे आग आटोक्यात आणण्यास मदत झाली. तसेच, विद्युत विभागाने देखील वीज प्रवाह बंद केला. दोन मुख्य आणि एक लहान शस्त्रक्रीया विभाग आहेत. आग लागल्यामुळे खराब झालेला शस्त्रक्रीया विभाग लवकरच दुरूस्त करण्यात येणार आहे.
याबाबत बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांनी सांगितले की, या घटनेत ऑपरेशन थिएटरमधील वैद्यकीय सामुग्री, वातानुकूलित यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. करोनाबाधितांवर उपचारासाठी उभारण्यात आलेला अतिदक्षता कक्ष दुसऱ्या इमारतीत असून त्याचे कोणतेही नुकसान झालेले नाही.