31 मार्चला सुनावणार शिक्षा
नवी दिल्ली: झारखंडचे माजी मंत्री एनोस एक्का यांना रांचीमधील न्यायालयाने आर्थिक गैरव्यवहाराबद्दल दोषी ठरवले. त्यांना 31 मार्चला शिक्षा सुनावली जाणार आहे.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात एक्का मंत्री होते. कोडा यांच्याशी संबंधित प्रकरणातच एक्का यांना दोषी ठरवण्यात आले आहे. ते प्रकरण सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) 2009 मध्ये उघडकीस आणले. त्या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली. तसेच, कोट्यवधींची मालमत्ता जप्त करण्यात आली. मनी लॉण्डरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) आता एक्का यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपावरून एक्का याआधी सीबीआयच्या रडारवरही आले होते. कोडा प्रकरणातील एक्का हे दुसरे दोषी ठरले आहेत. याआधी झारखंडचे माजी मंत्री हरीनारायण राय यांना दोषी ठरवण्यात आले. त्यांना 7 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. पीएमएलए हा महत्वपूर्ण कायदा 2005 मध्ये लागू करण्यात आला. त्या कायद्यांतर्गत आतापर्यंत 11 जणांना दोषी ठरवण्यात आले आहे.