मंचर- आंबेगाव विधानसभा निवडणुकीतील नामनिर्देशन पत्राची शनिवारी (दि. 5) घोडेगाव तहसील कार्यालयात छाननी करण्यात आली. यामध्ये मंगलदास बांदल, अरुण गिरे व ऍड. लक्ष्मण डामसे यांचे तीन अर्ज बाद झाले आहेत. निवडणुकीसाठी 9 उमेदवारांचे 13 अर्ज राहिले आहेत.
शपथपत्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म व वयाचा पुरावा जोडला नसल्यामुळे मंगलदास बांदल यांचा अर्ज बाद झाला आहे. अरुण गिरे यांनी शिवसेना पक्षाचा एबी फॉर्म जोडला नसल्याने त्यांचाही अर्ज बाद झाला आहे. तर वंचित बहुजन विकास आघाडीचे ऍड. लक्ष्मण डामसे यांनी नवीन प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. तसेच पूर्ण फॉर्म भरलेला नसल्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. हे तीन अर्ज बाद झाल्याने 9 उमेदवार उरले आहेत.
यामध्ये राष्टवादी कॉंग्रेसकडून दिलीप वळसे पाटील, शिवसेनेकडून राजाभाऊ भिवसेन बाणखेले, मनसेकडून वैभव दत्तात्रय बाणखेले, जनता दल कडून (सेक्युलर) नाथू हरिभाऊ शेवाळे, बहुजन समाज पार्टीकडून रवींद्र बाबुराव चव्हाण, भारतीय नवजवान सेनेकडून संजय लक्ष्मण पडवळ, राईट टू रिकॉल पार्टीकडून विशाल पोपट ढोकले, अपक्ष म्हणून अशोक दत्तात्रय काळे पाटील, अनिता शांताराम गभाले यांचे अर्ज राहिले आहेत.