किवळे (वार्ताहर) – मामुडींचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज व जोगेश्वरी माता उत्सवानिमित्त श्री भैरवनाथ महाराजांची पालखी छबिना मिरवणूक ढोल-ताशाच्या गजरात मोठ्या उत्साहात झाली. कुस्त्यांच्या जंगी आखाड्यात ‘भारत केसरी’ माऊली जमदाडे याने मानाची ‘श्री भैरवनाथ केसरी गदा पटकाविली. तर, विविध कार्यक्रमांनी उत्सवाची उत्साहात सांगता झाली.
उत्सवाच्या दिवशी ग्रामस्थांच्या हस्ते पहाटे काकड आरती व ‘श्री’चा महाअभिषेक करण्यात आला. नूतन दीपमाळेचे उद्घाटन सुदाम महाराज भोसले यांच्या हस्ते संध्याकाळी झाले. पालखी मिरवणूक गावात आल्यावर फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी करण्यात आली. तसेच वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला.
एकूण ५० निकाली कुस्त्या पार पडल्या. यामध्ये काही मुलींच्या देखील कुस्त्या झाल्या. या वेळी विशेष आकर्षण असलेली मानाची कुस्ती ‘भारत केसरी’ माऊली जमदाडे विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी’ गणेश जगताप यांच्यात झाली,
त्यामध्ये माऊली याने गणेश यास चितपट करून श्री भैरवनाथ केसरीपदाची गदा व रोख रक्कम मिळवली. सर्व कार्यक्रमांचे आयोजन शिवशक्ती तरुण मंडळ, श्री भैरवनाथ महाराज उत्सव समिती, शिवशंभो भजनी मंडळ व समस्त प्रामस्थ मामुडींगाव यांनी केले होते.